घरमहाराष्ट्रपुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पूर्ववत

पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक पूर्ववत

Subscribe

कोल्हापूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी ५ ऑगस्ट रोजी महामार्गावर पाणी भरले होते. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सोमवारी, तब्बल ८ दिवसांनंतर पुणे-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गाची एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. या राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सहावाजल्यापासून अवजड वाहनांची वाहतूक सूरू करण्यात आली. शिरोली फाटा परिसरात पाण्याची पातळी कमी होत असल्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरु झाली आहे.

कर्नाटकमधून कोल्हापूरकडे येणारी वाहतूक मात्र अजूनही सुरू झालेली नाही. या महामार्गाची पाहणी करून या महामार्गावरील दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे, कारण अजूनही त्या बाजुला दीड फूट पाणी साचलेले आहे. कराड ते कोल्हापूर या मार्गावर असणारे हजारो ट्रक तसेच अवजड वाहने मात्र हळूहळू पुराच्या पाण्यातून वाट काढत बेंगलोरच्या दिशेने रवाना होऊ लागले आहेत. या महामार्गावर आठ दिवस पाणी असल्याने दोन्ही बाजूस पंचवीस हजाराहून अधिक वाहने एकाच जागी अडकून पडली होती. या वाहनातील लोकांच्या जेवणाची सोय कोल्हापूरमधील आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी केली होती. आठ दिवसांनी ही वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

बळींची संख्या पोहचली ४३वर
कोल्हापूर आणि सांगलीत आणखी तीन मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या ४३ वर पोहोचली असून अद्यापही ३ जण बेपत्ता आहेत. कोल्हापूर आणि सातार्‍यात अतिवृष्टी होण्याचा इशारा वेधशाळेने दिला असल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

कोल्हापुरात जमावबंदी
कोल्हापूर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (1) अ ते फ आणि कलम ३७ (३ ) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात १२ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट २०१९ रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. याप्रकरणी आता राजकीय स्तरावर सरकारच्याविरोधात टिकेची झोड उगारण्यात येऊ लागली आहे. सरकार घाबरायला लागले आहे म्हणून कोल्हापुरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला, तर हे सरकार जनरल डायरचे सरकार आहे का? अशा जनरल डायर सरकारला घाबरुन न जाता त्यांना उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

- Advertisement -

धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरूच
अलमट्टी धरणातून ५ लाख ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे सोमवारी सकाळी ८.३० वाजता बंद करण्यात आले, मात्र धारणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून ४८ हजार ८९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम. शिंदे यांनी दिली. पंचगंगा नदीची राजाराम बंधार्‍याजवळील पाणी पातळी सकाळी ७ वाजता ४९ फूट होती, एकूण ८४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात ८.२१ टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अलमट्टी धरणात १००.७८६ टीएमसी पाणीसाठा आहे, तर कोयना धरणात १०२.५५ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ३.२७ टीएमसी, वारणा ३२.४६ टीएमसी, दूधगंगा २४.१४ टीएमसी, कासारी २.६६ टीएमसी, कडवी २.५२ टीएमसी, कुंभी २.५३ टीएमसी, पाटगाव ३.७२ टीएमसी, चिकोत्रा १.३९, चित्री १.८८ टीएमसी, जंगमहट्टी १.२२ टीएमसी, घटप्रभा १.५६ टीएमसी, जांबरे ०.८२ टीएमसी, कोदे (ल. पा.) ०.२१ टीएमसी असा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -