घरमहाराष्ट्रतुकाराम मुंढेंची दोन महिन्यांत आरोग्य खात्यातून उचलबांगडी, नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत

तुकाराम मुंढेंची दोन महिन्यांत आरोग्य खात्यातून उचलबांगडी, नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत

Subscribe

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंत 17 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत जवळपास 19 वेळा बदल्या करण्यात आल्या आहेत. तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत

मुंबईः आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे कायमच चर्चेत असतात. तुकाराम मुंढे आणि वाद जणू काही आता समीकरणच झालं आहे. तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा राज्याच्या आरोग्य खात्यातून बदली करण्यात आली असून, त्यांना कोणत्याही नव्या पदावर अद्याप नियुक्त केलेले नाही. कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मंगळवारी बदली करण्यात आली असून, त्यांना पदावरून मुक्त करताना सरकारने पदाचा कार्यभार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे सोपविण्याची सूचना केली आहे. दोन महिन्यांपूर्वीच म्हणजेच सप्टेंबर 2022 च्या अखेरीस तुकाराम मुंढे यांची आरोग्य सेवा आणि कुटुंबकल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानपदी नियुक्ती करण्यात आली होती, तसेच 1 ऑक्टोबर रोजी मुंढे यांनी डॉ. रामास्वामी एन. यांच्या जागी आरोग्य खात्याचा कार्यभार स्वीकारला होता, त्यानंतर त्यांनी राज्यात दौरे करून आरोग्य खात्याची झाडाझडती घेतली होती. त्यामुळे ते आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याही रडारवर आले होते.

खरं तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि मुंढेंमध्ये वारंवार खटके उडत होते. त्यामुळेच मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना पुढील अर्ध्या तासात मुंढेंची बदली झाली पाहिजे, असे आदेशच दिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कडक शिस्तीच्या मुंढे यांना आरोग्य खात्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आणले होते, मात्र मागील दोन महिन्यांत आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मुंढे यांच्या विस्तव जात नव्हता, त्यामुळेच अखेर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंडे यांची उचलबांगडी करत त्यांना पदमुक्त केले, त्यांना अजून नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही. त्यापूर्वी ते मानवाधिकार आयोगात सचिव म्हणून कार्यरत होते.

- Advertisement -

खरं तर तुकाराम मुंढेंनी आरोग्य खात्याचा कार्यभार खांद्यावर घेतल्यानंतर मराठवाड्याचा दौरासुद्धा केला होता. मराठवाड्याच्या दौऱ्यात रुग्णालयाची पाहणी करताना खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या सरकारी डॉक्टरांनाही निलंबित करण्याचा त्यांनी दम भरला होता. तसेच सरकारी रुग्णालयांत येणाऱ्या तपासण्यांचे रिपोर्ट खासगी लॅबमध्ये न करण्याची तंबीसुद्धा त्यांनी संबंधित डॉक्टरांना दिली होती. आरोग्य खात्यातही धडाकेबाज कामगिरीला सुरुवात केल्यानंतरच त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर रोजी मुंढे यांची डॉ. रामास्वामी एन. यांच्या जागी बदली करण्यात आली होती. आरोग्य विभागात बदली होताच त्यांनी धडाक्याने काम सुरू केले होते. राज्यातील विविध रुग्णालयांना भेटी देऊन रुग्णांशी संवाद साधत त्यांना दिल्या जात असलेल्या सेवा-सुविधांबाबत मुंढे यांनी माहिती घेतली होती. तसेच डॉक्टरांना मुख्यालयी थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आतापर्यंत 17 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत जवळपास 19 वेळा बदल्या करण्यात आल्या आहेत. तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते जिकडे काम करतात तिकडे विशेष छाप सोडून जातात. बऱ्याचदा प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या वादविवाद होत असतात, तुकाराम मुंढेंची काम करण्याची पद्धत सगळ्यांहून हटके असल्याने ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांची ओळखसुद्धा शिस्तबद्ध अधिकारी म्हणून आहे. यापूर्वीसुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची त्यांच्यावर वक्रदृष्टी होती, त्यामुळेच त्यांची मानवाधिकार आयोगात साइड पोस्टिंगला होते, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांची सप्टेंबरमध्ये मानवाधिकार आयोगातून थेट आरोग्याच्या खात्याच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती. परंतु तीन महिन्यांतच त्यांची पुन्हा उचलबांगडी करण्यात आली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे तुकाराम मुंढेंसोबत इतरही काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयएएस अधिकारी भाग्यश्री बानाईत यांची नागपूर विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच व्ही. एन. सूर्यवंशी यांची एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तपदावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तसेत सौम्या शर्मा यांची नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली आहे. एस. एम. कुर्ती कोटी यांची भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड करण्यात आली आहे. तसेच एस. एस चव्हा यांची कृषी विभागाच्या आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे.


हेही वाचाः सीमावादाचा प्रश्न हा काही गोष्टींकडून लक्ष वळविण्याचा प्रयत्न आहे का? राज ठाकरेंचा सवाल

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -