घरताज्या घडामोडीएकाच वर्गात दोन रंगांचे गणवेश?

एकाच वर्गात दोन रंगांचे गणवेश?

Subscribe

येत्या १५ जूनपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे नवीन दप्तर, वह्या, पाठ्यपुस्तकं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणवेश… या सर्व गोष्टींची खरेदी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, राज्य सरकारने गणवेशाबाबत घेतलेल्या निर्णयाची चर्चा होत आहे. कारण येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकसारखा गणवेश असणार आहे. तसेच एकाच वर्गात दोन रंगांचे गणवेश असणार आहेत.

राज्य सरकारने मनपा आणि जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये एकसमान, एकाच रंगाचा गणवेश देण्याचा निर्णय घेतलाय. येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा एकसारखा गणवेश असणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीतील सर्व मुले आणि दारिद्रयरेषेखालील पालकांच्या मुलांना दोन गणवेशाचा लाभ राज्य सरकारकडून देण्यात येतो.

- Advertisement -

आगामी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये मोफत गणवेश दारिद्रयरेषेवरील विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे. म्हणजेच सर्वच विद्यार्थ्यांना सरकारकडून एक आणि शाळा व्यवस्थापनाकडून एक असे दोन गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचं कारण असं की, शाळा व्यवस्थापनांनी आधीच गणवेशाची ऑर्डर देऊन ठेवली होती. राज्य सरकारने त्यानंतर एक राज्य-एक गणवेशाचा निर्णय घेतला. यामुळे सरकार आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात थोडी कुरबूर झाली. त्यावर सरकारने आता तोडगा काढलाय.

आठवड्यातील सुरुवातीचे तीन दिवस (सोमवार, मंगळवार, बुधवार) विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेचा गणवेश घालावा लागणार आहे. तर उर्वरित तीन दिवस (गुरुवार, शुक्रवार, शनिवार) विद्यार्थ्यांना शासनाकडून दिला जाणारा नवीन गणवेश घालावा लागणार आहे. २५ हजारहून अधिक सरकारी शाळा आणि ६५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना हा नियम लागू आहे.

- Advertisement -

गणवेश कसा असेल?

राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या वेगवेगळे गणवेश आहेत. गणवेशाचा रंगही वेगळा आहे. पण राज्य सरकारच्या या नवीन निर्णयानुसार, सरकारचा गणवेश हा सर्वांसाठी एकाच रंगाचा असणार आहे. आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट आणि मुलींसाठीही आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा सलवार कमीज अशा स्वरुपाचा हा गणवेश असणार आहे. शाळा व्यवस्थापनाच्या गणवेशाचा रंग वेगळा असेल तर विद्यार्थी आणि पालकांची डोकेदुखी वाढणार आहे.

पहिले तीन दिवस कोणत्या रंगाचा गणवेश घालायचा आणि उर्वरित तीन दिवस कोणता रंगाचा गणवेश वापरणार? हे पालक आणि विद्यार्थ्यांना लक्षात ठेवावे लागणार आहे. एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला याचा विसर पडला तर एकाच शाळेत दोन वेगवेगळ्या रंगाचे गणवेश घातलेले विद्यार्थी दिसल्यास नवल वाटायला नको.

गणवेश राज्यातील सरसकट सर्व शाळांना लागू असणार का?

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय राज्यातील सर्व शाळांना लागू नाही. तर सरकारी शाळा म्हणजेच राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा आणि महानगरपालिकेच्या शाळांना लागू असणार आहे. पण हा निर्णय सरकारी शाळांसाठी असून खासगी अनुदानीत शाळांनीही याचा विचार करायला पाहिजे, असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.


हेही वाचा : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पवारांच्या भेटीला, विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -