घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमनसेच्या मागणीनंतर नाशकात 'हर हर महादेव'चे दोन शो; राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

मनसेच्या मागणीनंतर नाशकात ‘हर हर महादेव’चे दोन शो; राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

Subscribe

नाशिक : राज्यभरात ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुण रणकंदन माजलेले असताना त्याचे पडसाद नाशकातही उमटले होते. वादाच्या पार्श्वभूमीवर शहरातील चित्रपटगृह चालकांनी वाद शमत नाही तोपर्यंत चित्रपटाचा शो न लावण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपटगृहांच्या या निर्णयाचे स्वागत करत राष्ट्रवादी कोंग्रेस तसेच स्वराज्य संघटना यांनीही पुन्हा शो सुरू करू नका असे सांगितले होते. मात्र, चित्रपटाचे शो रद्द केल्याच्या निषेधार्थ मनसे आक्रमक झाली होती. मनसेने शहरातील पीव्हीआर चित्रपटगृहात धडक देत ‘राज ठाकरे यांचा आवाज लाभलेला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट पुन्हा सुरू करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल’ असा इशारा दिला होता. मनसेच्या या मागणीला आता यश येताना दिसतय. शहरातील सिटी सेंटर मॉल मधील पीव्हीआर आणि नाशिकरोड येथील रेजिमेंटल याठिकाणी सायंकाळी अनुक्रमे ७ आणि ६:५५ वाजता ‘हर हर महादेव’ सिनेमा दाखवण्यात येणार आहे.

मनसेने खळखट्याकचा इशारा देत केलेल्या मागणी नंतर शहरात वादग्रस्त ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे शो दाखवण्यात येत आहेत. मात्र, चित्रपट सुरू न करण्याची मागणी करणारी राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच चित्रपटाचा शो लावल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा देणार्‍या स्वराज्य संघटनेच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. चित्रपटाच्या शोच्या निमित्ताने पुन्हा शहरात संघर्षाची स्थिती निर्माण होणार का असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत मनसेकडून किंवा राष्ट्रवादी, स्वराज्य संघटना यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया उमटलेली नाहीये. मात्र, मंगळवारी दिलेल्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी व स्वराज्य संघटना पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून चित्रपटगृहाच्या सुरक्षेत मागील दोन दिवसापासून वाढ करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -