जे यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते आम्ही केलं, नामांतरावरून ठाकरेंची खोचक टीका

Uddhav Thackeray

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या जिल्ह्यांच्या नामांतरासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तसेच जे यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं नाही ते आम्ही केलं, असं म्हणत ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, माझ्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आम्ही जे दोन प्रस्ताव मंजूर केले होते. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांचं नाव संभाजीनगर आणि धाराशिव असं देण्यात आलं आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या नावाच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. राज्य सरकारने इतर निर्णयाला स्थगिती दिली. परंतु या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली नाही. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

माझ्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीचा दिवस आजही मला आठवतोय. ज्याक्षणी हे दोन्ही प्रस्ताव आले. ते प्रस्ताव मांडल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी त्याला होकार दिला. याबाबत कोणीही शंका निर्माण केली नाही. जे नामांतर यापूर्वी सुद्धा जे मुख्यमंत्री करतो म्हणून म्हणाले होते. परंतु त्यांनी ते केलं नाही. ते आम्ही करून दाखवलं. त्याचा मला अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आमचे राजकीय विचार आणि भूमिका वेगळे आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्हीही त्याच मानसिकतेत आहोत. कारण आमच्या कुटुंबाशी आणि पक्षासोबत ते ज्या पद्धतीने वागत आहेत. हे नुसतं मतभेदाचं नाहीये. तर गेली ७५ वर्ष आपल्या देशात लोकशाही आहे. देशातली लोकशाही फक्त ७५ वर्षच टिकणार आहे का?, ही आम्हाला चिंता आहे. तसं जर असेल तर ती चिंता दूर करण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या वरिष्ठांनी करावं, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.


हेही वाचा : Big Breaking : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारची मंजुरी