गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसणार नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा

Uddhav Thackeray's speech from an open car in matoshree

गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसायचे नाही. आज महाशिवरात्रीचा दिवसाचा मुहूर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलं, धनुष्यबाण चोरलं गेलं आहे, पण चोरणाऱ्यांना माहिती नाही की, त्यांनी मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधमाशीने जमवलेल्या मधाचा स्वाद घेतला आहे पण अजून तो डंख लागलेला नाही, तो डंख आता मारण्याची वेळ आली आहे, असा इशारा आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री बाहेर ओपन कारमध्ये उभं राहून कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरे तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिंदे गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

…तरी शिवसेना संपवता येणार नाही

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, असा कोणता पक्ष नसेल ज्यावर अशाप्रकारचा आघात लोकशाहीत गेल्या 75 वर्षांत कधी झाला असेल, पण भाजपला आणि पंतप्रधान मोदींना त्याच्या हातातील गुलाम बनलेल्या ज्या काही सरकार यंत्रणा आहेत त्या अंगावर सोडून इतर पक्ष संपवता येतील पण शिवसेना संपवता येणं शक्य नाही, तुमच्या कितीतरी पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही.

निवडणूक आयुक्तांनी काल गुलामी केली

निवडणूक आयुक्तांनी काल गुलामी केली आहे. कदाचित निवडणूक आयुक्त निवृत्त झाल्यानंतर राज्यपाल होऊ शकतील, कारण आत्ताचं एक न्यायमूर्ती काल राज्यपाल झाले, असे सगळे गुलाम त्यांनी अवतीभवती ठेवले आहेत. त्या गुलामांना आव्हान देतो की, शिवसेना कोणाची हे महाराष्ट्राच्या मालकांनी ठरवण्याची वेळ आली आहे, जनतेला ठरवू दे शिवसेना कोणाची? यांना ठाकरे डाव पाहिजे, बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे, पण शिवसेनेचं कुटुंब नको आहे. आमच्यावर आरोप केले जात होते की, तुम्ही मोदींचं नाव सांगून मत मिळवलीत, तेव्हा आमची युती होती. एक जमाना जरुर होता जनता मोदींचे मुखवटे घालून सभेला येत होती, असही उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतयं

आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतयं, हीच बाळासाहेबांची ताकद आहे. मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतयं हा आपला मोठा विजय आहे. पण महाराष्ट्रातील जनता मुर्ख नाही, त्यांना मुखवटा कोणता आणि असली चेहरा कोणता हे माहिती आहे. पुन्हा एक आव्हान देतोय, ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव चोरायला दिलं गेलं. आपला पवित्र्य धनुष्यबाण चोराला दिला. ज्या पद्धतीने आणि कपट कारस्थानानं करतायत त्यापद्धतीने ते आली मशाल ही निशाणीही काढतील, अस म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

मर्द असाल तर धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो, उद्धव ठाकरेंचं आव्हान 

ज्यांनी धनुष्यबाण चोरलं ते मर्द असतील तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. तसेच हे चोर आणि चोर बाजारचे मालकं शिवधनुष्य पेलता उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला एकचं सांगायचं आहे, मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. ही ताकद जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत असे चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना निवडणूकीत गाडून आपण त्याच्या छाताडावर शिवरायांचा भगवा फडकवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे, असा म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला आव्हान दिलं आहे.

आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन 

आता आपली परीक्षा आहे लढाई तर आता सुरु झालेली आहे. माझ्या हातात आता काहीही नाही. मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. हे तरुण रक्त जे पेटलेलं आहे. शिवसैनिकांचा संयम त्यांनी पाहिला आहे शिवसैनिकांचा राग पाहू नका, असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला. काल एकनाथ शिंदेंच्या हातात धनुष्यबाणाचा फोटो होता तेव्हा त्यांचा चेहरा मी चोर असल्याचा होता. त्यामुळे आजपासून निवडणुकीच्या तयारीला लागा, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं आहे.


शिवसेनेची 2018 ची कार्यकारिणी लोकशाहीला धरूनच; अरविंद सावतांचा व्हिडीओ शेअर करत दावा