सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधीच केंद्रीय कायदे मंत्र्यांनी घेतली नार्वेकरांची भेट, चर्चेला उधाण

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अद्यापही समोर आलेला नाहीये. परंतु निकाल कधी लागणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, सत्तासंघर्षावरील निकाल १५ मेआधी येणं अपेक्षित आहे. यावेळी निकाल येण्यापूर्वीच केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मुंबईत भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू आणि राहुल नार्वेकर यांची विधानभवनात बंद दाराआड भेट झाली. परंतु या भेटीचे परिणाम सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालावर पडू शकतात. त्यामुळे येत्या १० दिवसांमध्ये निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार की ठाकरे गटाच्या बाजूने लागणार यावर अद्यापही ठोस माहिती समोर आलेली नाही. परंतु सुप्रीम कोर्टाने जर शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करण्याचा आदेश दिला, तर सरकारपुढे कोणते कायदेशीर पर्याय असतील यावरही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रिजिजू आणि नार्वेकर यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही नेमकी भेट कशासाठी होती. याबाबत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. देवेशचंद्र ठाकूर यांच्याशी आमची चर्चा झाली. कोणी म्हट्ले ही राजकीय चर्चा होती. मग रिजिजू आणि नार्वेकरांची भेट ही सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर झाली, असे म्हणायचे का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

दरम्यान, दोघांच्या भेटीवर नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि म्हणाले की, किरेन रिजिजू एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. त्यामुळे मी त्यांना चहापानासाठी बोलावले होते. दोघांमध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले.


हेही वाचा : दुसरा मंत्रिमंडळ विस्तार १५ मेनंतर!