घरमहाराष्ट्रनाशिक३६५ दिवस दररोज १५ तास चालणारी आदिवासी पाड्यातील ‘हुशार’ शाळा

३६५ दिवस दररोज १५ तास चालणारी आदिवासी पाड्यातील ‘हुशार’ शाळा

Subscribe

हिवाळी’चे भाग्य एका शिक्षकामुळे उजळले; मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी घडवण्याची अनोखी राष्ट्रसेवा

तब्बल ४१२ पर्यंत पाढे तोंडपाठ, भारतीय संविधानातील सगळीच कलमं अवगत.. राष्ट्रीय महामार्ग कोणते याची नावे सांगता येणार, जगभरातील देशांच्या राजधान्या पुस्तक न पाहता सांगणारे हे विद्यार्थी कोण असतील? कुणीही सांगेल, स्पर्धा परीक्षा देणारे… पण आपला अंदाज खोटा ठरविणारे काम त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या हिवाळी शाळेत होतेय. कारण इथल्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना हे सगळं अगदी तोंडपाठ आहे. इतकंच नव्हे तर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने विचारण्यात येणारी गणिते आणि तार्किक प्रश्नांची उत्तरेही हे विद्यार्थी अचूक देतात. झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आयएएस अधिकारी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून वर्षभरातील ३६५ दिवस दररोज १५ तास शिक्षण देणारी ही राज्यातील एकमेव शाळा चालवताहेत ते येथील शिक्षक केशव चंदर गावित.. राष्ट्रसेवेच्या उदात्त हेतूने आदिवासी पाड्यातील पिढी घडविणार्‍या अवलिया शिक्षकाविषयीचा ‘आपलं महानगर’चा विशेष वृत्तांत.
एम. ए. राज्यशास्त्र आणि डी.एड.चे शिक्षण घेतलेल्या केशव गावित यांनी महाविद्यालयीन अवस्थेत स्पर्धा परीक्षेसाठी जीवतोड मेहनत घेतली. घरची हालाखीची परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. पण परीक्षा देण्यापुरताही पैसा खिशात नसल्याने त्यांनी मार्केट यार्डात ४० रुपये रोजाने हमाली केली. एकीकडे पाठीवर क्रेट वाहत असताना दुसरीकडे ते उरलेल्या वेळेत एमपीएससीचा अभ्यास करत होते. २०१३ पर्यंत घरात विजेचा दिवा नव्हता. त्यामुळे रात्रीच्या वेळी चिमणीच्या प्रकाशातच अभ्यास होत. परंतु तरीही यशाने हुलकावणी दिली. आपला शैक्षणिक पाया पक्का असता तर आपण एमपीएससी उत्तीर्ण झालो असतो, ही खंत त्यांच्या मनाला अस्वस्थ करत होती. अशातच डीएड पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये हिवाळी येथील शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले. या शाळेत आल्यावर त्यांचा दृष्टीकोन बदलला. आपले स्वप्न या शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे त्यांनी मनोमन ठाणले. गावित सर रुजू झाले त्यावेळी केवळ एकच वर्ग खोली होती. शिक्षण नसल्यामुळे आयुष्याची वाताहत होते याचा अनुभव घेतलेले गावातील ज्येष्ठ नवसू भुसारे आणि महिंद्र वाघमारे यांनी गावातील शाळेसाठी राहते घर सोडले. या दोघांच्या घराच्या जागेवर छानशी शाळा उभी राहिली. दोघांना तुकाराम पवार यांनी घरासाठी आपली जागा दिली. अशा पद्धतीने लोकसहभागातून हिवाळे येथील शाळा उभी राहिली. शाळेतील एकमेव शिक्षक गावित सर चार किलोमीटर दररोज पायपीट करत शाळेपर्यंत येत. पण शिक्षणासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे आपल्यावर जी परिस्थिती बेतली ती अन्य कुणावरही येऊ नये म्हणून त्यांनी रोजची पायपीटही मान्य केली. मुलांना सुटी दिली तर त्यांचे लक्ष दुसर्‍या दिवशी विचलीत होते. कदाचित त्यांच्यात सुटी घेण्याची वृत्ती वाढीस लागते ही बाब अनुभवातून लक्षात आल्यावर गावित सरांनी एकही दिवस सुटी न घेता शाळा सुरु ठेवण्याचा संकल्प केला. केवळ संकल्पच केला नाही तर तो त्यांनी सत्यातही उतरुन दाखविला. आज ही शाळा ३६५ दिवस चालते. गावित सरांनीही आपल्या घर-दाराकडे दुर्लक्ष करत विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: झोकून दिले आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी एकही सुटी घेतलेली नाही. त्यांना अपत्य झाल्यावरदेखील केवळ सुटी घ्यावी लागेल या भितीने ते पत्नीच्या माहेरी गेले नाहीत, हे विशेष.

- Advertisement -

हिवाळी गावातील अनोख्या शाळेच्या व्हिडीओसाठी लिंक-https://www.facebook.com/mymahanagar/videos/2536143759987068

- Advertisement -

हटके शाळा अन् अध्यापन

गावित सरांची अध्यापनाची पद्धतीही हटके अशीच आहे. शाळेत आलेले विद्यार्थी तब्बल पंधरा तासाने घरी जातात. खेळ, गाणी, गप्पा, गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जाते. गावित सरच पहिले ते पाचवीपर्यंतच्या ३४ विद्यार्थ्यांना शिकवतात. प्रत्येक वर्गाचे समूह तयार करुन त्यांच्याच चर्चा घडवून आणली जाते. पाढे पाठांतरावर भर देण्यापेक्षा पाढ्यांच्या रचनेवर भर दिला जातो. त्यामुळे ते लवकर अवगत होतात. पहिलीच्या विद्यार्थ्यांना चाळीसपर्यंत तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४१२ पर्यंत पाढे पाठ आहेत. स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने तयारी होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शाळेत घडवले जाते. शाळेत छोटेखानी जेसीबी, कुलर, ड्रिल मशिन, हातपंप, लिफ्ट, पवनचक्की, डीजेचे वाहन यांसह असंख्य वैज्ञानिक खेळण्या साकारल्या आहेत. शाळेत शिक्षण देणार्‍या हजारो पताका तोरण स्वरुपात टांगलेल्या आहेत. इतकेच नाही तर बसण्याच्या जागेवर रंजक पद्धतीने गणिते रेखाटली आहेत. विद्यार्थ्यांची बुद्धी अधिक तल्लख व्हावी म्हणून अबॅकसची व्यवस्था करण्यात आली आहे. रुबीक्स क्युब अर्थात रंगीत ठोकळे तर ते अवघ्या काही क्षणांत लिलया जुळवतात.

अनोख्या संकल्पनेतील हिवाळी शाळेची फोटो गॅलरी-(फोटो- एजाज शेख)

अशी आहे आदिवासी पाड्यातील अनोखी हुशार शाळा

प्रवेशव्दारापासूनच दिसते ‘आदर्श गाव’-


गावाचं प्रवेशव्दार काठ्यांपासून तयार करण्यात आले आहे. त्यावर आदिवासी संस्कृतीची ओळख असलेले साहित्य लावण्यात आले आहे. प्रत्येक घराला मुलीचे नाव देण्यात आले आहे. या नावानेच घर ओळखले जाते. हा पॅटर्न आता संपूर्ण नाशिक जिल्ह्यात राबविण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या सीईआेंनी दिला आहे. प्रत्येक घराच्या भिंतींवर शिक्षण, जलजागृती, पर्यावरण आदींविषयीचे संदेश रेखाटण्यात आले आहेत. गावातील साफसफाई विद्यार्थीच करतात. गावातील सगळ्याच घरांना गीव्हच्या वतीने हिरवे रंग देण्यात आले आहेत. शिवाय गावात पूर्णत: दारुबंदी करण्यात आली आहे.

गीव्हने दिला मदतीचा हात

Ramesh Iyer

शाळेसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था शालेय पोषण आहार योजनेतून होते. रात्रीचे जेवणाची व्यवस्था गीव्ह संस्थेकडून केली जाते. संस्थेचे सर्वेसर्वा रमेश अय्यर हे या शाळेला कुटूंबाप्रमाणे जीव लावतात. इतकेच नाही तर गावाला स्वयंपूर्ण करण्यासाठीदेखील ते प्रयत्नशिल आहेत. यासाठी शिलाई काम, वारली पेंटिंग यांसारख्या कलांव्दारे त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिले आहेत. याशिवाय एज्युक्वॉईन या संस्थेने प्रत्येक विद्यार्थ्याला दोन पाट्या भेट स्वरुपात दिल्या आहेत.

गावातील मंडळी आपल्या कामांत असतात तेव्हा मुले शाळेत शिकत असतात. केवळ झोपण्यासाठीच ते घरी जातात. त्यांना शिकवण्यापासून खेळ घेण्यापर्यंत सर्वच काम शाळेत होते. त्यामुळे पालकही आनंदाने शाळेत मुलांना पाठवतात. इतकेच नाही तर आता आजूबाजूच्या गावातील आणि हिवाळी ग्रामस्थांचे बाहेरगावचे नातेवाईकही शिक्षणासाठी आपल्या मुलांना हिवाळी गावात पाठवायला लागले आहेत. शाळेतील तुळसा भुसारे ही पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सहावी तर मंजुळा भुसारे ही जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
केशव गावित, शिक्षक

३६५ दिवस दररोज १५ तास चालणारी आदिवासी पाड्यातील ‘हुशार’ शाळा
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -