घरआतल्या बातम्याVBA : सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून वंचितच्या उमेदवारांना धमक्या; सोलापूर, जळगावमधील माघारीचे कारण...

VBA : सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून वंचितच्या उमेदवारांना धमक्या; सोलापूर, जळगावमधील माघारीचे कारण आले समोर

Subscribe

मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यापाठोपाठ सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनीही आता उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सत्ताधारी पक्षांनी धमकावल्याने अर्ज मागे घेतल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी ‘माय महानगर’शी बोलताना स्पष्ट केलं आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने महाराष्ट्रातील 33 मतदारसंघामध्ये उमेदवार उतरवण्यात आले आहेत. मात्र, आमच्या असे लक्षात आले की, त्या उमेदवारांना सत्ताधारी पक्षांकडून धमकावण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, जळगाव येथे प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, सत्ताधारी पक्षातील नेत्यांना ते रूचलेले दिसत नाही. हा जैन समाजाचा व्यक्ती वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर आमच्या मतदार संघात कसा काय उभा राहतो? असा सवाल उपस्थित करत त्या उमेदवाराला त्रास देण्याचा प्रयत्न झाला, त्याला धमकावण्यात आले, त्यांच्या कुटुंबांला धमकावण्यात आले. त्यांचे व्यवहार रोखण्याचा प्रयत्न झाला आणि दबाव टाकून त्या उमेदवाराला उमेदवारी मागे घ्यायला लावली आहे. असा आरोप वंचितच्या उपाध्यक्षांनी केला आहे.

सत्ताधारी नेते कोण?

सत्ताधारी पक्षाच्या कोणत्या नेत्याने धमकावले असे विचारले असता जळगावमधील नेत्यांनी लोढा यांच्यावर दबाव टाकल्याचे मोकळे म्हणाले. जळगावमध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा दबदबा आहे, मात्र त्यांचे नाव न घेता मोकळेंनी सत्ताधारी नेत्यांचा दबाव असल्याचे म्हटले.

- Advertisement -

जळगावमध्ये दुसरा उमेदवार उतरवणार

जळगावमधील उमेदवाराने पक्षाशी संपर्क साधला आणि घटनाक्रम सांगितला. काही गोष्टी आमच्या हातातल्या होत्या, त्या आम्ही रोखू शकत होतो मात्र, काही गोष्टी आमच्या हातात नव्हत्या त्या कुटुंबांला नाहक त्रास नको हा विचार करून त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याला पक्षाने संमती दिली आणि त्या ठिकाणी दुसरा उमेदवार आम्ही उतरवला आहे, असेही मोकळे यांनी सांगितले.

सोलापूरमध्येही सत्ताधाऱ्यांचा दबाव

तसेच सोलापूर येथे सुद्धा आमच्या उमेदवाराने पक्षाशी संपर्क न साधता थेट उमेदवारी अर्ज मागे घेतला. तिथली माहिती काढल्यावर आमच्या लक्षात आले की, तिथे सुद्धा सत्ताधारी पक्षाने आमच्या उमेदवाराला धमकावले आहे आणि त्या दबावाला बळी पडून उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याचे मोकळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : VBA : वंचितच्या उमेदवारांचा माघार घेण्याचा सिलसिला कायम; सोलापूरनंतर या जिल्ह्यातही उमेदवाराची माघार 

आरएसएस – भाजपची सत्ता उलथवून टाकणार – मोकळे

अशा पद्धतीने आमच्या उमेदवाराला धमकावून, अर्ज मागे घ्यायला लावून गलिच्छ राजकारण जर इथला सत्ताधारी पक्ष करत असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की, वंचित बहुजन आघाडी हा लढाऊ बाण्याचा पक्ष आहे, प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष आहे. अशा कितीही धमक्या दिल्या, धमकावून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही आणि इथली आरएसएस – भाजपची सत्ता उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही मोकळे यांनी दिला आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024: सोलापूरमधून वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांची उमेदवारी मागे; फायदा कोणाला? 

वंचितचे राज्यातील उमेदवार

वंचित बहुनज आघाडीने राज्यात 33 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. तर सहा मतदारसंघामध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये नागपूर, कोल्हापूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे. तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला आहे.

Edited by – Unmesh Khandale 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -