विमान प्रवाशांचा नेमका ‘क्लास’ कोणता? सोडले ताळतंत्र, नैतिकतेला तिलांजली!

मुंबई : राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय विमान प्रवास असो, प्रवाशांनी ताळतंत्र सोडून अन् नैतिकतेला तिलांजली देत केलेले ‘उद्योग’ पाहता, या प्रवाशांचा नेमका ‘क्लास’ कोणता? असा प्रश्न निर्माण होतो. एकेकाळी विमानप्रवास हा स्टेट्स समजले जायचे, पण आता बस आणि लोकल ट्रेनसारखी त्याची स्थिती झाली आहे.

न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने एका 70 वर्षीय महिलेवर लघुशंका केल्याचे प्रकरण अलीकडेच उघडकीस आले. वस्तुत: ही घटना 26 नोव्हेंबर 2022 रोजी घडली होती, पण ती आत्ता जानेवारीत उघडकीस आली. त्या व्यक्तीला अटक करण्यात आली असली तरी, सोशल मीडियावर याची चर्चा सुरूच आहे. संबंधित व्यक्ती अमेरिकन कंपनीत उपअध्यक्ष होती, पण या घटनेनंर त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आले असल्याचे सांगण्यात येते.

त्यापाठोपाठ अगदी पुढच्याच महिन्यात अशाच प्रकारची घटना उघड झाली. 6 डिसेंबर 2022 रोजी पॅरीस-दिल्ली प्रवासात एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत महिलेच्या चादरीवर लघुशंका केली. मात्र संबंधित प्रवाशाने लेखी स्वरुपात माफी मागितल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. महिलेनेही त्याला माफ करत पोलीस तक्रार करण्यास नकार दिला.

तर, रविवारी (8 जानेवारी 2023) इंडिगो विमानात दोन-तीन प्रवाशांनी दारू पिऊन धिंगाणा घातला. दिल्लीहून पाटण्याला हे इंडिगोचे विमान येत होते. हवाई सुंदरीला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहेत. हे विमान पाटण्यात उतरल्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी सीआयएसएफच्या पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली आणि त्यानंतर या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.

लोकल ट्रेन किंवा प्रवासी बसमध्ये जागेवरून वा अन्य कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून हाणामारी झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर होतात. पण आता अशा मारामाऱ्या विमानातही होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बँकॉकहून भारतात येणाऱ्या विमानात एका व्यक्तीबरोबर बाचाबाची झाल्यानंतर तीन-चार जणांनी त्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हाणामारीचा प्रकार बांगलादेशच्या एका विमानात पाहायला मिळाला.

एकेकाळ विमानप्रवास हा कौतुकाचा विषय असायचा. पण विमानाच्या तिकिटांचे दर सर्वसामान्यांच्या अवाक्यात आल्यानंतर त्याची नवलाई जणूकाही संपुष्टातच आली आहे. त्यामुळेच बहुदा महिलांच्या अवमानाबरोबरच सहप्रवाशांबरोबर भांडण आणि हाणामारी, विमानातील कर्मचाऱ्यांशी अरेरावी असे प्रकार पाहायला मिळत आहे.

‘त्या’ घटनेची सर्वांना आठवण
वस्तुत: विमानात महिलांच्या अवमान करण्याचा प्रकार आताचा नाही, फार पूर्वीपासून असे घडल्याची नोंद आहे. 1984मध्ये वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना बॅरिस्टर रामराव आदिक उपमुख्यमंत्री होते. जर्मनीच्या हॅनोव्हर या शहरातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी जात असताना विमानात त्यांनी मद्यप्राशन केले आणि हवाई सुंदरीशी गैरवर्तन केले. याप्रकरणावरून चौफेर टीका झाल्यानंतर आदिक यांना राजीनामा द्यावा लागला होता.