घरमहाराष्ट्रSuraj Chavan : निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची पडद्यामागची सूत्रे सांभाळणारे सूरज चव्हाण कोण?

Suraj Chavan : निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची पडद्यामागची सूत्रे सांभाळणारे सूरज चव्हाण कोण?

Subscribe

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 6.37 कोटी रुपयांच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती तसेच युवा सेनेचे कार्यवाहक सूरज चव्हाण यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) काल बुधवारी (ता. 17 जानेवारी) रात्री उशिरा अटक केली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे देखील (EOW) याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. यानंतर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. पण सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असल्याने या प्रकरणावरून राजकीय वातावरण अधिक तापले आहे. (Who is Suraj Chavan who manages Thackeray group behind scenes during elections?)

हेही वाचा… Aditya Thackeray: दुर्दैवाने हजारो मुंबईकर…; महालक्ष्मी रेसकोर्ससंदर्भात आदित्य ठाकरेंनी सरकारवर केले ‘हे’ आरोप

- Advertisement -

सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे असल्याने त्यांनी कायमच आदित्य यांच्यासाठी पक्षामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. इतकेच नाही तर आदित्य ठाकरे यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखण्यात सूरज चव्हाण यांनी कायमच महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, मुंबई महापालिका निवडणूक, तसेच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांच्या आकडेवारीसह पक्षासाठी रणनीती आखण्यात त्यांचा उत्तम हातखंडा आहे. विविध निवडणुकांमध्ये ठाकरे गटाची पदड्यामागची गणितं सूरज चव्हाणांच्या हाती असतात, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात कायमच रंगलेली आहे. तर, आगामी महानगरपालिका निवडणुकीतही सूरज चव्हाण यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता ही कारवाई करण्यात आल्याने ठाकरे गटाला यामुळे मोठा धक्का बसला आहे.

काय आहे प्रकरण?

परप्रांतीय मजुरांसाठीच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी मुंबई महानगरच्या अधिकाऱ्यांसह अन्य काही जणांना 2 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मलिदा मिळाल्याचे सांगण्यात येते. यातील आरोपींनी स्थलांतरित मजुरांसाठी खिचडी बनवण्याचे कंत्राट बेकायदेशीररीत्या मिळवले. शिवाय, कराराचे उल्लंघन करत दुसर्‍या एजन्सीला उपकंत्राटही दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गेल्यावर्षी सूरज चव्हाण यांची जुलै महिन्यांत आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. या घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण यांचा संबंध असल्याचा संशय ईडीला असून त्याअनुषंगाने अटकेची कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे इतर काही पदाधिकारी ईडीच्या रडारवर असल्याचेही बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -