घरमहाराष्ट्रआरक्षणाच्या नावावर नुरा कुस्ती कशासाठी चालू आहे? सुषमा अंधारेंचा भुजबळांना थेट सवाल

आरक्षणाच्या नावावर नुरा कुस्ती कशासाठी चालू आहे? सुषमा अंधारेंचा भुजबळांना थेट सवाल

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षण असो की ओबीसी आणि धनगर आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, Adv. गुणरत्न सदावर्ते, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार नितेश राणे, मंत्री गिरीश महाजन आणि खुद्द तुम्ही असे सगळे लोक आरक्षणाचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे हे एकाच सरकारमध्ये आहात. मग आरक्षणाच्या नावावर ही नुरा कुस्ती कशासाठी चालू आहे? असा थेट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांना केला आहे.

हेही वाचा – दीड महिन्यात 4 हजार 285 वाहन चालकांवर कारवाई

- Advertisement -

आरक्षणासंदर्भात सुषमा अंधारे यांनी छगन भुजबळ यांना एक अनावृत्त पत्र लिहिले आहे. त्यात भुजबळ यांच्यासह सरकारच्याच भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणायचे की, शिवछत्रपतींची शपथ मी मराठ्यांना आरक्षण देणार आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी सांगायचे की, मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. एकीकडे मराठा आरक्षणाच्या विरोधात फडणवीस यांना श्रद्धेय म्हणणारे गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल करायची तर, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या विरोधात संघाचा समर्थक असणाऱ्या सराटे नावाच्या माणसाने याचिका दाखल करायची. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद चिघळत ठेवून कोणाचे भले होणार आहे? आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या या सगळ्या जातींनी आपापसात भांडत राहून तरण्याबांड पोरांवर गुन्हे दाखल करून घेत गाव शहर समाज किती दिवस पेटत ठेवायचा? असा परखड प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

एकीकडे भाजपामधील काही लोकांनी धनगर आरक्षणाची मागणी करायची आणि आम्हाला एसटीतून आरक्षण हवे आहे म्हणायचे तर, दुसरीकडे आमदार नरहरी झिरवाळ यांनी त्या आरक्षणाला विरोध करत, असे झाले तर आमचे 25 आमदार राजीनामा देतील, अशी धमकी द्यायची. एकीकडे आम्ही मराठा आरक्षणाच्या सोबतच आहोत असे उपोषणस्थळी जाऊन संदिपान भुमरे, अतुल सावे किंवा गिरीश महाजन यांनी सांगायचे तर, दुसरीकडे जरांगेचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न विचारत भुजबळ, नितेश राणे आणि प्रवीण दरेकर यांनी विरोध करायचा, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तंटामुक्त गाव समिती कागदावरच गावातील भांडण, तंटे पोलीस ठाण्यात

आपल्या भाषणामध्ये तुम्ही या राज्याचा काही काळ उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणारे नेते तथा मनोज जरांगे यांच्यापेक्षा जास्त शिकलेले बुद्धिजीवी म्हणून आरक्षणाचा सवाल थेट केंद्रात बसलेल्या भाजपा सरकारला का विचारला नाही? कलम 368 (क)नुसार विशेष दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारे संसदेतील बहुमत भाजपाकडे आहे तरीही भाजपा जाती-जातीमधला हा संघर्ष का पेटवत आहे? ओबीसींबद्दल गळे काढून बोलणाऱ्या लोकांना खरंच ओबीसींचे प्रश्न कळले आहेत का? असे सवाल करत सुषमा अंधारे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

हैदराबादमध्ये रोहित वेमुल्लाची जशी संस्थात्मक हत्या झाली तशी महाराष्ट्रामध्ये किरण जाधव या मायक्रो ओबीसीतल्या तरुण डॉक्टरची हत्या झाली, हे किती ओबीसी नेत्यांना माहीत आहे? धुळे साक्रीमध्ये मायक्रो ओबीसीच्या पाच लोकांना ठेचून मारण्यात आले, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देताना सरकारमध्ये बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काय पद्धतीचा न्याय लावला, हे किती ओबीसी नेत्यांना माहित आहे? असे प्रश्नही त्यांनी केले आहेत.

हेही वाचा – ओबीसी हक्क संघर्ष समितीचा जरांगेंना इशारा

महाराष्ट्रातला मायक्रो ओबीसी हा आरक्षण कशाशी खातात हेही ज्यांना माहीत नाही, त्यांचे किमान आधारकार्ड, मतदान ओळखपत्र अशी साधी कागदपत्र ज्यांच्याकडे नाही आणि जन्मभर भटकंती केली तरी किमान मेल्यावर जागा म्हटले तर स्मशानभूमी सुद्धा नाही, हे प्रश्न ओबीसी नेत्यांनी कधी संसदेत किंवा विधिमंडळात मांडले आहेत का? असा घणाघाती हल्ला सुषमा अंधारे यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -