घरमनोरंजनअभिनेत्री कंगणा राणौतची चौकशी

अभिनेत्री कंगणा राणौतची चौकशी

Subscribe

चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी बॉलिवूडची वादग्रस्त अभिनेत्री कंगणा राणौत हिला वांद्रे पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. कंगना ही सध्या मनालीच्या तिच्या राहत्या घरी असल्याने तिच्या वतीने तिच्या वकिलांनी मुंबईत चौकशीसाठी हजर राहण्याची समर्थता दर्शविली आहे. 14 जूनला सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा तपास सध्या वांद्रे पोलिसांकडून सुरू आहे. याच प्रकरणात आतापर्यंत 40 हून अधिक लोकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. या जबानीतून अनेक गोष्टींचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले तरी सुशांत हा मानसिक तणावात होता, त्यातून नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगणाने बॉलिवूडमधील गटबाजीसह घराणेशाहीबाबत काही गंभीर आरोप केले होते. इतकेच नव्हे तर काही चित्रपट निर्माता-दिग्दर्शकासह कलाकारांवर थेट आरोप केले होते. याबाबत तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याच पार्श्वभूमीवर कंगणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कंगणाच्या खार येथील राहत्या घरी वांद्रे पोलिसांची एक टीम गेली होती, तिथे तिला समन्स बजाविण्यात आले. मात्र, कंगणा ही मनाली येथे वास्तव्यास असल्याने समन्स पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यात कंगणाला 27 जुलै ते 31 जुलैदरम्यान चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

या समन्सनंतर कंगनाच्या वतीने तिच्या वकिलांनी पत्राद्वारे कंगना ही सध्या हिमाचल प्रदेशच्या मनालीमध्ये वास्तव्यास आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती मुंबईत चौकशीसाठी हजर राहू शकत नाही. त्यामुळे वांद्रे पोलिसांच्या टिमने मनाली येथे जाऊन तिची चौकशी करावी, तिला काही प्रश्नावली पाठवावी, जेणेकरुन ती तिचे उत्तर देऊ शकेल नाहीतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तिची चौकशी व्हावी अशी विनंती केली आहे. वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर आता पुढील दिशा ठरविली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -