घरमुंबईरुसाकडून आठ कॉलेजला मान्यता

रुसाकडून आठ कॉलेजला मान्यता

Subscribe

मुंबईतील तीन कॉलेजांचा समावेश

उत्तम दर्जाचे शिक्षण, कॉलेजमध्ये प्रयोगशीलता निर्माण व्हावी तसेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाकडून (रुसा) राज्यातील आठ कॉलेजांना स्वायत्तेचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये मुंबई मेट्रोपोलिटीन रिजनमधील तीन कॉलेजांचा समावेश आहे. त्यामुळे या कॉलेजांना शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी रुसाकडून पाच कोटींचा निधी मिळणार आहे. रुसाच्या या निर्णयामुळे राज्यातील 68 कॉलेज, तर मुंबईतील 18 कॉलेजांना स्वायत्तेचा दर्जा मिळालेला आहे.

एकविसाव्या शतकातील वेगवान बदलांना सामोरे जाण्यासाठी अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी कॉलेजमध्ये कौशल्यावर आधारित शिक्षण, नवनवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करणे, अभ्यासक्रमाबरोबरच परीक्षेत महत्त्वपूर्ण बदल करणे, शिक्षणात प्रयोगशीलता आणता यावी यासाठी सरकारकडून नॅकच्या मानांकनानुसार पात्र असणार्‍या कॉलेजांना रुसाकडून स्वायत्तेचा दर्जा देण्यात येतो. यावर्षी देशभरातून स्वायत्तेचा दर्जा मिळावा यासाठी 365 अर्ज आले होते. या अर्जातून महाराष्ट्रातील आठ कॉलेजांना स्वायत्त दर्जा मिळाल्याचे रुसाकडून जाहीर करण्यात आले.

- Advertisement -

आठ कॉलेजमधील तीन कॉलेजही मुंबई मेट्रोपोलिटीन रिजनमधील आहेत. यामुळे महाराष्ट्रामध्ये आता तब्बल 68 कॉलेजांना तर मुंबईमध्ये 18 कॉलेजांना स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. तसेच राज्यातील अन्य पाच कॉलेजांना लवकरच स्वायत्ततेचा दर्जा मिळण्याची शक्यता रुसाकडून वर्तवण्यात आली. स्वायत्ततेचा दर्जा मिळालेल्या आठ कॉलेजांना रुसाकडून कॉलेजमध्ये मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाच कोटींच्या निधीतून कॉलेज विद्यार्थ्यांना अद्ययावत उपकरणे, कॉम्प्युटर लॅब, स्मार्ट बोर्ड, अद्ययावत लायब्ररी अशा सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे. कॉलेजांना स्वायत्तता दिल्याने त्यांच्यामध्ये स्पर्धा वाढेल, या स्पर्धेमुळे गुणवत्ता वाढीस मदत होईल, त्यामुळे भविष्यात उत्तमोत्तम शिक्षण व्यवस्था देशात निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रधान सचिव आणि रुसाच्या राज्य प्रकल्प संचालक मीता राजीवलोचन यांनी सांगितले.

अन्य अनुदानावर परिणाम नाही
रुसाकडून कॉलेजांना स्वायत्तेचा दर्जा दिल्यानंतर त्यांना मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी रुसाकडून पाच कोटीचा निधी देण्यात येणार आहे. परंतु रुसाकडून स्वायत्ततेचा दर्जा मिळाला तरी ते कॉलेज संलग्न असलेल्या विद्यापीठाकडून किंवा सरकारकडून मिळणार्‍या अनुदानावर कोणताही परिणाम होणार नाही.

- Advertisement -

एसएनडीटी विद्यापीठाकडून कॉलेजला स्वायत्तता
एसएनडीटी विद्यापीठाच्या जुहू येथील डॉ. भानूबेन महेंद्र नानावटी कॉलेज ऑफ होम सायन्सला स्वायत्तेचा दर्जा मिळाला आहे. स्वायत्तता मिळणारे एसएनडीटी विद्यापीठातील हे एकमेव व पहिले कॉलेज ठरले आहे. नानावटी कॉलेजला स्वायत्तेचा दर्जा मिळाल्याने एसएनडीटी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

स्वायत्तता मिळालेली कॉलेज
– डॉ. भानूबेन महेंद्र नानावटी कॉलेज ऑफ होम सायन्स, मुंबई
– गुरूनानक खालसा कॉलेज, मुंबई
– छगुकाना ठाकूर कॉलेज, पनवेल
– कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
– छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा
– सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड
– तुलजराम छतुरचंद कॉलेज
– सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे

स्वायत्तता मिळण्याची शक्यता
– एमएमपी वूमन्स कॉलेज
– आर. ए. पोद्दार कॉलेज
– निर्मला निकेतन इन्स्टिटयूट
– तिरुपडे कॉलेज ऑफ सोशल वर्क
– प्रताप कॉलेज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -