घरमुंबईआयुक्तांना डावलून पदपथांवर सर्रास पेव्हरब्लॉक

आयुक्तांना डावलून पदपथांवर सर्रास पेव्हरब्लॉक

Subscribe

मुंबईच्या पदपथांवरून पेव्हरब्लॉक हद्दपार करून त्याठिकाणी सिमेंट काँक्रिटचे आकर्षक पदपथ बनवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिल्यानंतरही पदपथांवर पेव्हरचे थर चढू लागले आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार पेव्हरब्लॉक पदपथावरून हद्दपार होणार आहेत. वास्तवात मात्र कंत्राटदारांचे हित डोळ्यासमोर ठेवून ज्या पदपथांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे त्याठिकाणी सर्रासपणे सिमेंट काँक्रिटचे पदपथ बनवण्याऐवजी पेव्हरब्लॉकचा वापर सुरू आहे, अशाप्रकारे आयुक्तांच्या आदेशाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे.

मुंबईच्या पदपथांच्या दुरुस्तीची कामे योग्यप्रकारे होत नसल्याने तसेच उखडलेल्या पेव्हरब्लॉकमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ५ जानेवारी रोजी झालेल्या मासिक आढावा बैठकीत पदपथांवरील पेव्हरब्लॉक काढून त्याऐवजी सिमेंट काँक्रिटचे पदपथ बनवण्यात यावे, असे आदेश दिले होते. आयुक्तांच्या आदेशानंतर जी/उत्तर विभागातील एल.जे. मार्ग, टि.एच.कटारिया मार्ग, सेनापती बापट मार्ग आदी प्रमुख मार्गाच्या पदपथावरील जुन्या लाद्या काढून त्या जागी पेव्हरब्लॉक बसवले जात आहेत. महापालिकेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्तांच्या आदेशानंतरच पदपथांसाठी तरतूद केलेल्या निधीचा विनियोग करण्यासाठी तातडीने कार्यादेश देण्यात आले आहेत. भविष्यात पेव्हरब्लॉक पदपथांवर बसवले जाणार नसल्याने अनेक कंत्राटदारांना दिलेल्या पेव्हरब्लॉकच्या ऑर्डरचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला. हे सांभाव्य नुकसान टाळण्यासाठी कंत्राटदारांनी तातडीने पदपथ दुरुस्तीचे काम हाती घेऊन पेव्हरब्लॉक बसवण्यास सुरुवात केली. एरव्ही एका पदपथाच्या कामासाठी दहा ते पंधरा दिवसांचा अवधी घेणारे कंत्राटदार आता तीन दिवसांमध्येच पदपथांची कामे पूर्ण करताना दिसत आहेत.

- Advertisement -

एकीकडे आयुक्तांच्या आदेशाला हरताळ फासून पदपथांवर पुन्हा पेव्हरब्लॉक बसवले जात असताना दुसरीकडे मात्र, दक्षिण मुंबईतील गोपाळराव देशमुख मार्ग, केम्स कॉर्नर आदी भागातील पदपथांवरील पेव्हरब्लॉक काढून, त्याऐवजी सिमेंट क्राँक्रिटचे आकर्षक पदपथ तयार करण्यात आले आहेत. डी विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी सिमेंट काँक्रिटचे पदपथ बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

पदपथांवर पेव्हरब्लॉक बसवू नयेत, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्तांचे आहेत. त्यामुळे कार्यादेश दिल्यानंतर जी कामे अर्धवट असतील त्याच ठिकाणी पेव्हरब्लॉक बसवण्यास परवानगी आहे. परंतु, निविदा प्रक्रिया होऊन कार्यादेश दिल्यानंतरही जर कामाला सुरुवात झालेली नसेल तर त्याठिकाणी ते कार्यादेश रद्द करून नव्या धोरणाप्रमाणे फेरनिविदा मागण्याच्या सूचना विभाग कार्यालयांना करण्यात आल्या आहेत. याबाबतचे सुधारित परिपत्रकही जारी केले जात आहे. परंतु, आयुक्तांच्या आदेशानंतर डी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पदपथांच्या विकासकामांमध्ये पेव्हरब्लॉकऐवजी सिमेंट काँक्रिटचाच वापर करण्यात आला आहे.
– विनोद चिठोरे, प्रमुख अभियंता, रस्ते विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -