घरमुंबईब्रेनस्ट्रोकच्या झटक्यानंतरही परीक्षेची जिद्द

ब्रेनस्ट्रोकच्या झटक्यानंतरही परीक्षेची जिद्द

Subscribe

बारावीच्या बोर्डाकडून लेखनिकाची तरतूद

परीक्षेला चार दिवस असताना अचानक आलेल्या ब्रेनस्ट्रोकच्या झटक्यामुळे त्याच्या डाव्या बाजुच्या शरीरातील शक्ती क्षीण झाली होती. तसेच त्याची श्रवणशक्तीही कमी झाली होती. त्यामुळे परीक्षा कशी द्यायची, असा प्रश्न नेरूळमधील रोहित तार्कसेसमोर निर्माण झाला होता. पण काहीही झाले तरी आपण परीक्षा द्यायची असा निश्चय केलेल्या रोहितची तळमळ लक्षात घेऊन नियमात नसतानाही बोर्डाने लेखनिकाची तरतूद केली आहे. त्यामुळे रोहित आता परीक्षेला बसणार आहे.

नेरूळ येथे राहणारा रोहित तार्कसे याला 17 फेब्रुवारीला ब्रेनस्ट्रोकचा झटका आला. तसेच त्याच्या डाव्या बाजूला अर्धांगवायूचा झटका आल्याने त्याची डावी बाजू काम करेनाशी झाली. त्यामुळे डावखुर्‍या रोहित तार्केसेसमोर परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न निर्माण झाला. पण काहीही झाले तरी आपण परीक्षा द्यायची असा निश्चय रोहितने घेतला होता. मुलाच्या जिद्दीमुळे त्याच्या वडील उत्तम तार्कसे यांनी थेट मुंबई विभागीय मंडळात धाव घेत अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कैफियत मांडली. रोहितची परिस्थिती व डॉक्टरांचे कागदपत्रे पाहिल्यानंतर रोहितच्या प्रकरणातील गांर्भीय लक्षात घेऊन त्याला विशेष लेखनिक देण्याची मागणी त्याच्या वडिलांनी केली. बोर्डाच्या नियमानुसार श्रवणशक्ती कमी असलेल्या विद्यार्थ्याला लेखनिक देण्याची कोणतीही तरतूद नाही. पण आम्ही रोहितचे सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. त्यामुळे आम्ही त्याला लेखनिक देण्याचा निर्णय घेतल्याचे मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी सांगितले.

- Advertisement -

रोहितवर सध्या नेरूळमधील धन्वंतरी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्याला विद्याभवन इंग्लिश स्कूलमध्ये परीक्षेसाठी केंद्र आले आहे. रोहितची प्रकृती स्थिर असल्याने डॉक्टरांनी त्याला परीक्षा देण्याची परवानगी दिली आहे. रोहित हा हुशार विद्यार्थी असून, तो परीक्षेला मुकू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्याला यश आले असल्याची माहिती रोहितचे वडील उत्तम तार्कसे यांनी सांगितले. रोहित हा सायन्स शाखेतून परीक्षा देत असून त्याने सराव परीक्षाही दिली आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -