घरCORONA UPDATEमहापौरांच्या निर्देशानंतरही नर्सेससह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या समस्या कायमच

महापौरांच्या निर्देशानंतरही नर्सेससह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या समस्या कायमच

Subscribe

रुग्णालयांमधील नर्सेसने थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहून जाहीरपणे नाराजी उघड करत पीपीई किटसह वाहनांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांसह नर्सेसही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. यासर्वांना पॅरॉमेडिकल स्टाफसह सुरक्षा रक्षक आदींचीही साथ लाभत आहे. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहेत. त्यातच आता रुग्णालयातील नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांनाही याची बाधा होऊ लागली आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेविषयी सर्व रुग्णालयांमधील नर्सेसने थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहून जाहीरपणे नाराजी उघड करत पीपीई किटसह वाहनांची व्यवस्था करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या पूर्वाश्रमीच्या नर्सच आहे. त्यामुळे नर्सेसची प्रतिनिधीच महापौरपदावर असतानाही नर्सेसच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे याचीच खंत आता नर्सेसकडून व्यक्त होताना दिसत आहे.

पीपीई किटनर्सेसना कुठून देणार

कोरोनासंदर्भात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करताना ज्या गैरसोयींना नर्सेसना सामोरे जावे लागते, त्याचा पाढाच वाचत त्यांनी कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी स्वत:च्या सुरक्षेसाठी पीपीईची मागणी केली आहे. परंतु अद्यापही नर्सेसना पीपीई किट उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पीपीई किट दवाखान्यांमधील डॉक्टरांना उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. तर नर्सेसना कुठून देणार, असा सवालही त्यांनी केला आहे. परंतु, मोठ्या रुग्णालयातील नर्सेसची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे आणि घेतली जाईल,असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

महापौरांच्या या भेटी केवळ औपचारिकताच

किशोरी पेडणेकर यांनी मुलुंड मधील स्वातंत्र्यवीर सावरकर, अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालय, वरळी पोद्दार रुग्णालय, शीव लोकमान्य टिळक रुग्णालय, विलेपार्ले कुपर रुग्णालय, मुंबई सेंट्रल नायर रुग्णालय, वांद्रे भाभा रुग्णालय, कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय अर्थात शताब्दी रुग्णालय आदी रुग्णालयांमध्ये भेट दिली. तसेच तेथील अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्षक आदींची चर्चा करून तेथील डॉक्टर, नर्सेससह पॅरॉमेडिकल स्टाफच्या तक्रारींच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आढावा घेत त्यांच्या अडचणी सोडवण्याचे निर्देश दिले. परंतु, महापौरांच्या या भेटी केवळ औपचारिकताच ठरत आहे. महापौरांच्या भेटीनंतरही नर्सेस तसेच पॅरामेडिक स्टाफच्या अडचणी काही कमी झालेल्या नाहीत.

महापौरांच्या भेटीनंतरही समस्या ‘जैसे थे’च

नर्सेसना पीपीई किट पूर्णपणे उपलब्ध करून दिलेलेच नाही. शिवाय वाहनांची गैरसोय अजूनही तशीच आहे. नर्सेस आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जी वाहने रुग्णालयाच्यावतीने उपलब्ध करून देतात, त्यामध्ये सोशल डिस्टंशिंग हा प्रकारच नसल्याची खंत रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. महापौरांच्या भेटीनंतरही समस्या ‘जैसे थे’च असून जर नर्सेस किंवा या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना याची बाधा झाली तर सेवा कोण देणार असा सवाल करत त्यांनी भीती व्यक्त केली.

- Advertisement -

महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माझ्या निर्देशानंतरही अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार माझ्या कानावर आली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर उपचार होत आहे. तेथील डॉक्टरांसह नर्सेस तसेच इतर कर्मचाऱ्यांना पीपीई किट द्यायला हवे. परंतु इतरांना एन ९५ मास्क, सॅनिटायझर्स, हातमोजे द्यायला हवे. तसेच वाहनांचीही व्यवस्था व्हायलाच हवी. याबाबत अधिष्ठाता आणि अधिक्षक यांना अधिकार देऊनही जर ते करत नसतील आणि आमच्या निर्देशाचे पालन करणार नसतील तर जे उद्भवेल त्याला तेच जबाबदार असतील. त्यामुळे याबाबत माझा पाठपुरावा सुरुच असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त रमेश पवार यांनी याबाबत बोलताना, रुग्णालयांमध्ये ज्या वस्तुंची कमतरता आहे, त्याची खरेदी संबंधित अधिष्ठाता तसेच अधिक्षक करून उपलब्ध करून देऊ शकतात. जर त्यांना शक्य नसेल तर मध्यवर्ती खरेदी खात्याच्यावतीने किंवा मदतनिधीत प्राप्त झालेल्या भांडारातून उपलब्ध करून दिल्या जातील. परंतु ज्या रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहे, अशा कक्षामधील डॉक्टर्स, नर्सेससह पॅरामेडिक स्टाफसह सफाई कामगारालाही पीपीई द्यायला हवे आणि त्यानुसार प्रशासन देत आहे. परंतु, आता या कक्षा व्यतिरिक्त इतर कक्षातील नर्सेस, इतर स्टाफ पीपीईची मागणी करत आहे. पण याचा थेट संबंधच कोरोनाग्रस्तांशी येत नाही, तर मग त्यांना पीपीई कसे द्यायचे. ज्यांना गरज आहे, त्यांना प्रशासन देत आहे. असेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा – धोक्याचा इशारा; इतर देशापेक्षा भारतात कोरोनाचा मृत्यूदर अधिक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -