घरमुंबईभिवंडीत भूमिगत गटार योजनेचा उडाला बोजवारा; रस्ते खोदल्याने नागरिक त्रस्त

भिवंडीत भूमिगत गटार योजनेचा उडाला बोजवारा; रस्ते खोदल्याने नागरिक त्रस्त

Subscribe

भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात ईगल इन्फ्रास्ट्रक्चरल या खाजगी कंपनीच्या माध्यमातून भूमिगत गटार टप्पा क्र. २ चे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र कामात दिरंगाई होत असून सर्वत्र रस्ते खोदून ठेवल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह दुचाकी तसेच रिक्षा चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने ठेकेदार कंपनीला आदेश दिले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रस्त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कंपनी ठेकेदारास कामाचे देयक अदा करू नये, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक निलेश चौधरी यांनी पालिका आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

bhiwandi
भिवंडी

शहरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून रस्ते नादुरुस्त झाले आहेत. या खड्यांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. असे असताना पालिका क्षेत्रात भूमिगत गटार टप्पा क्र. – २ या योजनेचे काम करणाऱ्या मे. ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीच्या ठेकेदाराने अशोक नगर, गणेशनगर, न्हावीपाडा, अवचित पाडा, दिवांशा दर्गाह, भंडारी कंपाउंड, नारपोली, कामतघर, ताडाळी, ब्रम्हानंद नगर, अंजूर फाटा, राजीव गांधी नगर आदी विविध भागात रस्ते खोदून ठेवले आहेत. पावसामुळे या खड्यांमध्ये पाणी साचून रस्ते मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाले आहेत.

- Advertisement -

खोदण्यात आलेल्या रस्त्याची माती सर्वत्र पसरून चिखल झाला आहे. रिक्षा आणि मोटार सायकलींचे घसरून रोजचे अपघात होत आहेत. या रस्त्यांवरून बाजारहाट करण्यासाठी जाणाऱ्या महिला, विद्यार्थी नागरिकांना चिखल तुडवत रस्त्यांवरून जावे लागत आहे. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आदेश दिले आहेत. तसेच नागसेवकांनी देखील ठेकेदाराच्या गलथान कारभाराविरोधात तक्रारी केल्या आहेत. तरीसुद्धा कंपनी ठेकेदार हेतू पुरस्सर दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांनी तात्काळ कारवाई करावी, तसेच केलेल्या कामाचे परीक्षण केल्याशिवाय देयक अदा करू नये, अशी मागणी भाजप नगरसेवक निलेश चौधरी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -