घरमुंबईरेल्वेची अ‍ॅसिड धुलाई

रेल्वेची अ‍ॅसिड धुलाई

Subscribe

मध्य रेल्वेकडून एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचे डबे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात अ‍ॅसिडचा वापर केला जात आहे. अ‍ॅसिडच्या धुलाईमुळे रेल्वेच्या डब्यांची झीज होते. पण यापेक्षा भयंकर आणि धक्कादायक म्हणजे या डब्यांची धुलाई करणार्‍या कर्मचार्‍यांच्या हातापायांना गंभीर जखमा होत असल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. याप्रकरणी रेल्वे संघटनांकडून वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासन हे बेफिकीर असून कर्मचार्‍यांच्या आरोग्याशी खेळत आहे, असा आरोप संघटनांनी केला आहे. रेल्वेच्या या गलथानपणामुळे कर्मचार्‍यांची ‘अ‍ॅसिड होरपळ’ होत आहे.

रेल्वेच्या डब्यांची सफाई करण्यासाठी रेल्वे विभागात पूर्वी खलाशी पद होते. परंतु त्या कर्मचार्‍यांना डब्यांच्या धुलाईसाठी योग्य साधनसामुग्री प्रशासनाकडून पुरवण्यात येत नसे. त्यामुळे डब्यांची स्वच्छता व्यवस्थित होत नसे. त्यामुळे प्रवाशांकडून डब्यांच्या अस्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. वाढत्या तक्रारींमुळे रेल्वे प्रशासनाने डब्यांच्या स्वच्छतेची जबाबदारीचे कंत्राट खासगी कंपनीला दिले. कंत्राटदाराकडून रेल्वे डब्यांच्या धुलाईचे नियम धाब्यावर बसवण्यात येत आहेत. कंत्राटदाराकडून रेल्वेच्या डब्यांची धुलाई करण्यासाठी अ‍ॅसिडचा वापर करण्यात येत आहे. मात्र ही धुलाई करताना कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कसलीही दक्षता घेण्यात येत नाही. कर्मचार्‍यांना हातमौजे, पायमौजे तसेच अन्य साहित्य कंत्राटदाराकडून देणे बंधनकारक आहे. मात्र कंत्राटदाराकडून सुरक्षेचे कोणतेचे साहित्य देण्यात येत नाही. वाडीबंदर येथील कर्मचारी कोणत्याही सुरक्षेच्या साहित्याशिवाय काम करत आहेत. त्यामुळे डब्यांची अ‍ॅसिड धुलाई करताना कर्मचार्‍यांना दुखापत होण्याच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत. अ‍ॅसिडच्या वापरामुळे रेल्वेच्या डब्यांचा रंग उडण्याबरोबरच झीजही होते. त्यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए.के. जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी संबंधित विभागाकडून माहिती घेतो, असे सांगितले.

- Advertisement -

Acid-wash-of-Central-rail1

नोकरीवरून काढण्याची धमकी

आम्ही अ‍ॅसिडच्या वापराबाबत तक्रारी केल्यास ठेकेदाराकडून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे रेल्वे आणि ठेकेदाराविरोधात तक्रार करण्याची आम्हाला हिंमत होत नाही. खासगी सफाई कर्मचार्‍यांना रेल्वेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांपेक्षाही कमी वेतन मिळते, असे नाव न छापण्याच्या अटीवर काही सफाई कर्मचार्‍यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.

रेल्वेच्या स्वच्छतेसाठी अ‍ॅसिडचा वापर केला जात असल्यामुळे खासगी सफाई कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांच्या हातापायावर पांढर्‍या रंगाचे चट्टे पडले आहेत. डेपोप्रमुख याबद्दल मौन बाळगून आहेत. त्यामुळे संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून आंदोलन करण्यात येईल.
– अमित भटनागर, उपाध्यक्ष, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, मुंबई.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -