Coastal Road: कोस्टल रोड प्रकल्प मुंबईकरांच्या जीवनाला गती देणारा, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामात, पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. पैकी मरिन ड्राइव्हकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या पहिल्या बोगद्याचे खणन  आज पूर्ण झाले

CM Uddhav Thackeray on Coastal Road project

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हे सर्व मुंबईकरांचे स्वप्न आहे. मुंबईकरांच्या जीवनाला गती देणाऱ्या या प्रकल्पाचे बांधकाम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मेहनतीने आणि चिकाटीने करण्यात येत आहे. ठरलेल्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईल, याचा मला आत्मविश्वास असून प्रकल्पाच्या पहिल्या बोगद्याचे खणन जलदगतीने पूर्ण होणे ही त्याची पोचपावतीच आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी सोमवारी येथे काढले.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) बांधकामात, पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. पैकी मरिन ड्राइव्हकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या पहिल्या बोगद्याचे खणन  आज पूर्ण झाले. त्याप्रसंगी आयोजित ‘ऑनलाईन’ समारंभात  उद्धव ठाकरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.

मावळा नावाचे बोगदा खणन करणारे संयंत्र त्याच्या नावाला साजेसे काम करीत असून त्याच शिस्तीने मुंबई महानगरपालिका प्रशासन देखील या प्रकल्पाचे बांधकाम करीत आहे. नैसर्गिक वादळांसह कोविड संसर्गाचे संकट आणि त्यामुळे उद्भवलेली टाळेबंदी सारखी परिस्थिती यांना खंबीरपणे सामोरे जावून अविरतपणे प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. समुद्राखालून दोन टोकं जोडण्याचे काम करण्यात मावळा संयंत्र यशस्वी झाले आहे. किनारा रस्ता प्रकल्प हे एकप्रकारे मुंबईचे स्वप्नं आहे. फक्त रस्ता बांधून न थांबता त्याच्या भोवती रमणीय आणि प्रेक्षणीय जागा विकसित केल्या जाणार आहेत.

या प्रकल्पाच्या बांधकामात अनेक आव्हाने आहेत. मात्र महानगरपालिकेने ही आव्हाने स्वीकारुन मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने दमदार वाटचाल सुरु ठेवली आहे. प्रकल्प निर्मितीसाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य आणि पाठबळ मिळेल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री  आदित्य ठाकरे म्हणाले की, किनारा रस्त्याच्या पहिल्या बोगद्याचे खणन आज पूर्ण झाले असून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हे काम आत्यंतिक कठिण स्वरुपाचे असून ते यशस्वीरित्या वर्षभराच्या आत पार पाडणे, ही विक्रमी स्वरुपाची कामगिरी आहे. वर्षभरापूर्वी किनारा रस्त्याच्या पहिल्या बोगद्याच्या कामास शुभारंभ करण्यात आला होता. आता दुसऱ्या  बोगद्याचे काम एप्रिल २०२२ मध्ये सुरु होईल.

केवळ बोगदाच नव्हे तर संपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, याचा विश्वास आहे. मुंबईकरांचे राहणीमान सुखकर करण्याच्या दृष्टीने अर्थात इज ऑफ लिविंगसाठी विविध कामे मुंबई महानगरात सुरु आहेत. गोरेगाव-मुलूंड जोडरस्ता, पारबंदर प्रकल्प (एमटीएचएल), मुंबई मेट्रो या सर्व प्रकल्पांसह मुंबई कोस्टल रोडमध्ये देखील महानगराचा विकास पुढे नेण्याची मोठी क्षमता आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी  यावेळी नमूद केले.


हेही वाचा – Mumbai coastal road: प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटी दरम्यान कोस्टल रोडच्या टनेलिंग काम पूर्ण, मावळा टीबीएमची पहिली मोहीम फत्ते