घरमुंबईनववी व अकरावीचे विद्यार्थी होणार प्रमोट

नववी व अकरावीचे विद्यार्थी होणार प्रमोट

Subscribe

राज्यातील 22 लाख विद्यार्थ्यांना दिलासा

पहिली ते आठवीच्यापाठोपाठ नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही वर्गोन्नती देण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी जाहीर केला. त्यामुळे नववीतील 19 लाख 8 हजार 976 तर अकरावीच्या 13 लाख 54 हजार 383 विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याने काही दिवसांपूर्वी राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून उपस्थित करण्यात येत होता.

कोविड 19 महामारीच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी च्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करण्यात आल्या होत्या. इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासन स्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आहेत व अद्याप देखील ते सुरू आहेत. मात्र, मार्चपासून राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढील वर्गात उत्तीर्ण करण्याचा निर्णय शालेेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून घेण्यात आला होता.

- Advertisement -

मात्र, नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत कोणतेही धोरण स्पष्ट केले नव्हते. त्यामुळे नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निर्णयही तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण विभागातील अधिकारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यामध्ये नववीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या 19 लाख 8 हजार 976 तर अकरावीच्या 13 लाख 54 हजार 383 विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी
खेड्या-पाड्यांत संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. यासाठी शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

परीक्षा वेळेवरच घेण्यासाठी प्रयत्न
कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी ग्रामीण भागामध्ये याचे प्रमाण कमी आहे. परंतु मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरी भागातून अनेक कामगार स्थलांतर करून गावी जात आहेत. यामुळे भविष्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढण्याची भीती आहे. आयसीआयसी, सीबीएससी व आयबी बोर्ड यांच्या परीक्षा वेळेवर होणार आहेत. त्यामुळेच भविष्यात होणार्‍या अनेक स्पर्धात्मक परीक्षेत राज्यातील मुले मागे पडण्याची शक्यता आहे. पुढील व्यावसायिक अभ्यासक्रम या दृष्टीने राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा वेळेवर व्हावी, असा सूर काही पालक व्यक्त करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -