आता राज्यात डिजिटल मतदार ओळखपत्र

votimg 1

राज्यातील निवडणूक विभागाकडून दरवर्षी नवमतदार नोंदणी अभियान घेतले जाते. जानेवारी २०२१मध्ये राज्यातील मतदारांची संख्या ९ कोटी ०८ लाख ३३ हजार २०३ पर्यंत पोहचली आहे. या एकूण मतदारांमध्ये १८ ते १९ या वयोगटातील १२ लाख ९७ हजार ०३५ नवमतदारांचा समावेश आहे. गतवर्षीपेक्षा यंदा 6 लाखांनी मतदारांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे सोमवारपासून या नवमतदारांना डिजिटल मतदार ओळखपत्राचे वाटप केले जाणार आहे. या डिजिटल मतदार ओळखपत्राचे उद्घाटन राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सोमवारी होणार आहे. त्यामुळे आता राज्यातून लॅमिनेशन केलेले मतदार ओळखपत्र हद्दपार होणार आहे.

राज्यात निवडणूक विभागाकडून राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि विशेष: नवमतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. या अभियानानंतर जानेवारी २०२१मध्ये राज्यातील मतदारांची संख्या ९ कोटी ०८ लाख ३३ हजार २०३ पर्यंत पोहोचली आहे. या एकूण मतदारांमध्ये १८ ते १९ या वयोगटातील १२ लाख ९७ हजार ०३५ नवमतदारांचा समावेश आहे. या १२ लाखांहून अधिक नवमतदारांना पहिल्या टप्प्यात डिजिटल मतदार ओळखपत्राचे वाटप केले जाणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनी डिजिटल मतदार ओळखपत्राचे प्रकाशन केल्यानंतर तातडीने पुढील सात दिवसांत संबंधितांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट निवडणूक कार्यालयाने समोर ठेवले आहे. गेल्या वर्षी राज्यात 4 कोटी 71 लाख 1 हजार 870 पुरुष आणि 4 कोटी 30 लाख 78 हजार 620 महिला तसेच 2 हजार 823 तृतीयपंथ असे एकूण जानेवारी 2020 रोजी ९ कोटी १ लाख ८० हजार ४९० मतदार होते. यंदा 4 कोटी 74 लाख 50 हजार 448 पुरुष आणि 4 कोटी 33 लाख 80 हजार 272 महिला तसेच 2 हजार 444 तृतीयपंथ असे एकूण जानेवारी 2021 ला ९ कोटी ०८ लाख ३३ हजार २०३ मतदार आहे.

आज होणार उद्घाटन

डिजिटल मतदार ओळखपत्राचे पहिल्या टप्प्यात १८ व १९ वयोगटातील नवमतदारांना वाटप होणार आहे. त्यानंतर ज्यांना डिजिटल मतदार ओळखपत्र हवे त्यांना ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे. डिजिटल मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी मतदारांचा मोबाईल क्रमांक मतदार यादीशी लिंक असावा लागेल. डिजिटल मतदार ओळखपत्रासाठी जो मोबाईल क्रमांक लिंक असेल, त्यावर आयोगाकडून खात्री करून घेण्यासाठी ओटीपी क्रमांक पाठवला जाईल. या ओटीपी क्रमांकानंतर मोबाईलवर डिजिटल मतदार ओळखपत्र मिळवता येईल.

ओळखपत्रातील त्रुटी दुरुस्त होणार

आत्तापर्यंत मतदारांना लॅमिनेशन केलेले मतदार ओळखपत्र दिले जात होते. मात्र, आता मतदारांना डिजिटल ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे मतदार नोंदणीपासून मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नावात व पत्त्यात बदल किंवा अन्य कामांसाठी निवडणूक आयोगाकडून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे मतदारांना मोठा फायदा होणार आहे.