घरमुंबईवरळीच्या जागेसाठी अभियंत्यांमध्ये चुरस; मर्जीतील कार्यकारी अभियंत्यासाठी आमदारांची शिफारस

वरळीच्या जागेसाठी अभियंत्यांमध्ये चुरस; मर्जीतील कार्यकारी अभियंत्यासाठी आमदारांची शिफारस

Subscribe

मुंबई : गेल्या 3 महिन्यांपासून रिक्त असलेल्या मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात वरळी कार्यकारी अभियंता पदाची जागा पटकविण्यासाठी इच्छुक अभियंत्यांमध्ये जोरदार चुरस लागली आहे. एका जागेसाठी 4 अभियंत्यांनी जोर लावला असून त्यासाठी भाजपच्या 3 ते 4 आमदारांनी आपले शिफारस पत्र दिले आहे. त्यामुळे या जागेवर नेमकी कुणाची वर्णी लागणार याविषयी बांधकाम खात्यात प्रचंड उत्सुकता आहे.

वरळीच्या जागेसाठी आपल्या मर्जीतील अधिकार्‍याची नियुक्ती करावी म्हणून भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र दिले आहे. या शिफारस पत्रानंतर चव्हाण यांनी बदलीसाठी पात्र असलेल्या अधिकार्‍यांचा तपशील मागवला आहे. त्यामुळे वरळीसाठी इच्छुक असलेल्या अधिकार्‍यांच्या मंत्रालयातील फेर्‍या वाढल्या आहेत.

- Advertisement -

संजय इंदूलकर हे ३१ मे २०२२ रोजी वरळीच्या कार्यकारी अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून वरळीच्या जागेचा अतिरिक्त कार्यभार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकात्मिकृत घटक विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष माने यांच्याकडे आहे. माने पुढील वर्षी सेवानिवृत्त होत असून त्यांचाही डोळा वरळीच्या जागेवर असल्याचे समजते. याशिवाय सत्यनारायण कांबळे, संदीप कोटलवार, महेंद्र पाटील आणि रवींद्र पाटील या 4 अधिकार्‍यांकडून वरळी कार्यकारी अभियंता पदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

यापैकी कांबळे हे इलाखा शहर मुंबई कार्यकारी अभियंता पदासाठी इच्छुक होते. कांबळे यांच्यासाठी विद्यमान अभियंता चंद्रशेखर नाईक यांची बदली करण्याचे निश्चित झाले होते, मात्र ऐनवेळी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी नाईक यांच्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना गळ घातली. त्यामुळे शेवटच्या क्षणी नाईक यांची बदली रद्द करण्यात आली. त्यामुळे सत्यनारायण कांबळे यांनी आता वरळीच्या जागेसाठी जोर लावला आहे. कांबळे यांच्यासाठी भाजप आमदार किसन कथोरे यांनी पत्र दिले आहे.

- Advertisement -

आमदारांकडून पत्रप्रपंच

मुंबईतील जे. जे. रुग्णालय विभागाचे उपभियंता संदीप कोटलवार यांना लवकरच कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळणार आहे. ही पदोन्नती मिळेल असे गृहीत धरून कोटलवार हेही वरळीच्या रिंगणात उतरले आहेत. कोटलवार हे माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात. चव्हाण मंत्री असताना कोटलवार हे नांदेडहून मुंबईत आले आहेत. त्यांच्यासाठी भाजपचा एक मंत्री प्रयत्नशील असल्याचे समजते, तर संगमनेर येथील कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील यांच्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पुण्यातील महेंद्र पाटील यांच्यासाठी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी पत्रप्रपंच केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री वरळीच्या जागेसाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याची उत्सुकता वाढली आहे.


छत्रपती शिवरायांचे स्मरण करत पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतीय नौदलाच्या नव्या ध्वज चिन्हाचे अनावरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -