फटाका कंपनीत भीषण स्फोट

१५ किलोमीटरचा परिसर हादरला, पाच जण गंभीर जखमी

Fire

डहाणू तालुक्यातील डेहणे-पळे ग्रामपंचायत हद्दीतील विशाल फटाका कंपनीमध्ये गुरुवारी भीषण स्फोट झाला आहे. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की त्यामुळे १५ किलोमीटरचा परिसर हादरला होता. आगीत पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्या हादर्‍याने दीड ते दोन किलोमीटर परिसरातील अनेक घरांच्या खिडक्या आणि पत्रे फुटले.

डेहणे-पळे ग्रामपंचायत हददीत विशाल फटाका कंपनी आहे. सकाळी कंपनीत वेल्डींगचे काम सुरू होते. त्यावेळेस वेल्डींगच्या ठिणग्या फटाक्याच्या ज्वलनशिल दारूवर पडून आग लागली. ही आग वेगाने पसरल्याने मोठी आग लागून कंपनीत पाच ते सहा मोठे स्फोट झाले. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की १५ किलोमीटरचा परिसर हादरला होता. तसेच दीड ते दोन किलोमीटर परिसरात असलेल्या घरांना त्याचा मोठा फटका बसला. अनेक घरांच्या खिडक्या आणि पत्रे तुटले. आग इतकी प्रचंड होती की आगीचे लोळ सुमारे २५ ते ३० फूटापर्यंत उसळून आगीचे रौद्र रुपाने अनेकांना धडकी भरली होती. तर कंपनीच्या परिसरात लावलेली वाहने स्फोटाच्या दणक्याने दूरवर फेकली गेली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी भीषण आगीवर तीन तासाच्या अथक प्रयत्नाने यश मिळवले. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, आगीच्या तडाख्याने कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर आगीमुळे कंपनी परिसरातील अनेक झाडे जळून खाक झाली. या आगीत नवनीत लोट, सुखदेव सिंग, महेश मोरे, असिफ खान, प्रेमचंद चव्हाण हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील 4 जणांना डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून एकाला गुजरातमधील वापी येथे हलवण्यात आले आहे. कंपनीत 100 च्यावर कामगार काम करत असल्याची महिती कंपनीतील एका कामगाराने दिली आहे.