घरमुंबईआधी रेल्वे सुधारा, मग बुलेट आणि मेट्रो आणा!

आधी रेल्वे सुधारा, मग बुलेट आणि मेट्रो आणा!

Subscribe

अजित पवार यांची सरकारवर टीका

सत्तेवर येण्यापूर्वी लेाकांना अनेक स्वप्ने दाखवली, पण या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेनवर सव्वा कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. पण आधी रेल्वेसेवा सुधारा, मग बुलेट आणि मेट्रो ट्रेन सुरू करा, असा टोला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी डोंबिवलीत माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमात बोलताना भाजप सरकारला लगावला.

डोंबिवली पश्चिमेला असलेल्या भागशाळा मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, सत्तेवर येण्यापूर्वी शेतकर्‍यांची कर्जमाफी करू, काळा पैसा देशात आणू, प्रत्येकाच्या खात्यात लाखो रूपये जमा करू, अशा घोषणा दिल्या. पण प्रत्यक्षात सरकारने काहीही केले नाही. उलट नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन गरीबांना अधिक गरीब केले. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी दिलेली नाही. दुष्काळाची स्थिती असूनही दुष्काळ घोषित केला जात नाही. शासनाच्या कोणत्याही निर्णयावर सामान्य माणूस समाधानी नाही. नोटाबंदी, आर्थिक मंदी, कर्जबुडवे व्यापारी यामुळे देशातील बँकांचा एनपीए ७ लाख ३४ हजार कोटींवर गेला आहे. युती शासनाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात राज्यावर अडीच लाख कोटींचे कर्ज वाढले आहे. सरकारची प्रशासनावर पकड नाही. राज्यात स्थिती विदारक झाली आहे.

- Advertisement -

शिवसेना सरकारमध्ये असताना एकीकडे कुंभकर्णा जागा हो, पहारेकरीच चोर, अशी टीका करते आणि दुसरीकडे यांचे मंत्री मांडीला मांडी लावून बसतात. खिशातले राजीनामे लोकांना दाखवायचे आणि दुसरीकडे यांच्याच नेतृत्वाने ‘जागा वाटप गेले खड्ड्यात’ म्हणायचे. गेल्या चार-साडेचार वर्षात प्रभू रामचंद्र यांना कधीही आठवले नाही. अयोध्येनंतर पंढरपूर आणि आता सोमनाथला निघाले आहेत. शिवसेना नेतृत्वाच्या या भूमिकेमुळे शेतकर्‍यांची मनस्थिती द्विधा झाली आहे, असे खडेबोल अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सुनावले.

कल्याण-डोंबिवलीत सेना-भाजपची सत्ता आहे. त्यांना पॅकेज जाहीर केले. पण एकही पैसा मिळालेला नाही. शिवसेना भाजपने कल्याण डोंबिवलीकरांची फसवणूक केली असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर या ठिकाणी पायाभूत विकास केला असल्याचे सांगायलाही ते विसरले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -