बोरीवलीच्या दहिसर नदीवरील वाहतूक पुलाचा पहिला टप्पा आजपासून होणार खुला

बोरिवली (पूर्व) मधील श्रीकृष्ण नगर येथील दहिसर नदीवरील पूल हा पश्चिम द्रुतगती महामार्ग व श्रीकृष्ण नगर, नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, अभिनव नगर, शांतिवन या भागाला जोडणारा पूल आहे. या परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी हा एकमेव महत्त्वाचा पूल आहे. सदर पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने सदर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

मुंबईः बोरीवलीतील दहिसर नदीवरील पुलाच्या दुरुस्ती कामानंतर पहिल्या टप्प्यातील ११ किलोमिटरचा रस्ता शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खुला करण्यात येणार आहे. या पुलामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

या सोहळ्यासाठी  पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह यांच्यासह विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

बोरीवली (पूर्व) मधील श्रीकृष्ण नगर येथील दहिसर नदीवरील पूल हा पश्चिम द्रुतगती महामार्ग व श्रीकृष्ण नगर, नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, अभिनव नगर, शांतिवन या भागाला जोडणारा आहे. या परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी हा एकमेव महत्त्वाचा पूल आहे. सदर पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने सदर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. एप्रिल २०२२ मध्ये जुना पूल निष्कासित करुन त्यानंतर पुलाचे विस्तारीकरण व पुनर्बांधणीचे काम तातडीने सुरु करण्यात आले. सदर संपूर्ण पुलाचे बांधकाम इंटिग्रेटेड डेक स्लॅब व ब्रीज पीलर पद्धतीने करण्यात येत आहे. पूर्ण पुलाची एकूण लांबी ४१.५ मीटर इतकी आहे. यामध्ये उत्तर व दक्षिण वाहिनीकरिता प्रत्येकी २ मार्गिका आहेत. स्पॅन लांबी ही १३.५० मीटर, १३.६० मीटर आणि १३.५० मीटर इतकी आहे.

संपूर्ण पुलापैकी, पहिला टप्पा ११ मीटर रुंदीचा असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी २००० घन मीटर काँक्रिट वापरात आले आहे. तसेच ४९० मेट्रिक टन लोखंड (रिइन्फोर्समेंट), ३०० मेट्रिक टन डांबर मिश्रण वापरात आले आहे. वाहतुकीसाठी या पुलाचे आत्यंतिक महत्त्व लक्षात घेता, पहिला टप्पा जलदगतीने पूर्ण करण्यात आला असून शनिवारपासून तो खुला करण्यात येत आहे.

दुसऱ्या टप्प्यातील पुलाच्या कामाचा काही भाग वन विभागाच्या (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) अंतर्गत येत आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. सदर प्रस्ताव प्रगतिपथावर आहे. वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त होताच दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ११.३० मीटर रुंदीच्या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.