घरमुंबईआधी ताकद दाखवा, मग जागावाटपाचे बघू!

आधी ताकद दाखवा, मग जागावाटपाचे बघू!

Subscribe

राज्यात गेली साडेचार वर्षे सत्तेत असूनही एकमेकांवर आग ओकणार्‍या भाजप-शिवसेनेची युती झाल्यानंतर त्यांच्यात गोडवा निर्माण झाला असला तरी त्यांच्या मित्रपक्षांची तोंडे सध्या तरी दुसरीकडेच आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये ४८ जागांपैकी शिवसेना २३, तर भाजपाच्या वाट्याला २५ जागा आल्या असताना आम्हाला काय? असा प्रश्न मित्रपक्षांकडून विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर, आधी तुमची मेळाव्यातून ताकद दाखवा, नंतर जागांचे बघू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षांना खडसावल्याचे समजते.

युती करताना शिवसेना-भाजपाने मित्रपक्षांना विचारात न घेतल्याने ते नाराज झालेत. नाराज मित्रपक्षांनी एकत्र येऊन चर्चादेखील केली होती. मात्र तरीदेखील भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षांकडून मित्रपक्षांकडे दुर्लक्षच केल्याने नेमके करायचे तरी काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी, आधी तुमची मेळाव्यातून ताकद दाखवा, असे सांगितल्यामुळे मित्रपक्षांची चांगलीच गोची झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी फर्मान सोडल्यामुळे मित्रपक्षांतील काहींनी धास्ती घेतली असून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर मेळाव्याच्या कामाला लागले आहेत. तर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपसोबतच राहण्याचे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी घाटकोपरमधील पंतनगर येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे उपस्थित होते. मात्र कार्यक्रमातील रिकाम्या खुर्च्या पाहून प्रकाश मेहता यांनी आठवलेंचे भाषण सुरू होण्याआधीच काढता पाय घेतला, अशी माहिती ‘आपलं महनगर’ला मिळाली.

विशेष बाब म्हणजे भाजपासोबत असलेल्या पाचही घटक पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी किती जागा मित्र पक्षांना द्यायच्या याचा अद्याप विचार झालेला नाही. महादेव जानकर यांनी तर सहा जागा मागितल्या असून त्यांना बारामती ही एकच जागा भाजपा सोडण्यासाठी तयार आहे. तर रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी हातकणंगलेची जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र युती झाल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला जाणार आहे. विनायक मेटे यांनीदेखील जागा मागितली आहे. मात्र त्यांना जागा द्यायची की, नाही याचा अजून विचार दोन्ही पक्षांनी केलेला नाही. त्यामुळे निवडणुकीला अवघे काही दिवसच उरले असताना मित्रपक्षांच्या वाट्याला फक्त प्रतीक्षा करण्यापलिकडे काही उरलेले नाही.

- Advertisement -

दरम्यान, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावा, या मागणीसाठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. रिपब्लिकन पक्षाचा एकही प्रतिनिधी लोकसभेत नसल्याने रामदास आठवले यांनी निवडून येऊन लोकसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व करावे, अशी आंबेडकरी जनतेची मागणी आहे. ईशान्य मुंबईमधील जनतेकडून हिच मागणी होत आहे. यासाठी हा मतदारसंघ आपल्याला सोडावा, अशी आग्रही मागणी आठवलेंनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. त्यावर उत्तर देताना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत बोलणार असल्याचे आश्वासन दिले, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.

मित्रपक्षांसाठी येत्या दोन दिवसात भाजपा-शिवसेना निर्णय घेईल आणि जागा सोडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. शिवसेना-भाजपा किती आणि कोणत्या जागा आमच्यासाठी सोडणार आहे, याची आम्ही सर्व मित्रपक्ष वाट बघत आहोत. – विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -