घरमुंबईनिराधार वृद्धांना ‘या’ दाम्पत्याकडून मोफत अन्नदान

निराधार वृद्धांना ‘या’ दाम्पत्याकडून मोफत अन्नदान

Subscribe

म्हातारपण हे दुसरे लहानपण असल्याचे नेहेमीच बोलले जाते. आपल्या लहानपणी जसे आपले आई-वडील आपल्याला सांभाळतात त्याचप्रमाणे भविष्यात मुलेही सांभाळतील, याची शाश्वती कोणालाही नसते. म्हातारपणी कोणावरही अवलंबून न राहण्याठी आयुष्यभर काबाडकष्ट करुन लोक पैसा जमवतात. पैसा असला तरच म्हातारपण सुखाने जाते का ? हा प्रश्न आज सर्वांनाच पडतो. आयुष्यातील शेवटच्या काळातील आजारामुळे अनेक वृद्ध जीवनाला कंटाळतात. आजारपणात वृद्धांची काळजी त्यांच्या घरचे घेतीलच, असे नाही. अशा निराधार वृद्धांसाठी बोरिवली येथील डिसोजा दाम्पत्य धावून आले आहे. मागील पाच वर्षांपासून निराधार वृद्धांना मोफत जेवणाचा डब्बा देण्याचा वसा या दाम्पत्याने उचलला. त्यांच्या या सेवेमुळे वृद्धांना मदतीचा हात मिळतो तर या दाम्पत्यालाही आपल्या आई-वडिलांची सेवा केल्याचाच आनंद मिळतो. विशेष म्हणजे ही सेवा घेणाऱ्यांपैकी अनेक वृद्धांचे पाल्य मोठ्या पदावर कार्यरत आहेत किंवा परदेशी नोकरी करत आहे. नोकरीमुळे वेळ नसल्यामुळे आज ते आपल्या आई वडिलांचा सांभाळ करु शकत नाहीत.

बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनीत राहणारे मार्क डिसोजा (59) यांचे आई-वडिल सध्या हयात नाहीत. आपल्या आई-वडिलांसाठी आम्हाला जेजे करायचे होते ते आम्ही या माध्यामातून पूर्ण करीत आहोत, असे ते सांगतात. आयसी कॉलनी, कांदरपाडा, योगीनगर, दहिसर, अंधेरी, वांद्रे, माहिम आणि दादर परिसरातील वृद्धांना चपाती, भाजी, डाळ, भात आणि कडधान्याची उसळ असा जेवणाचा डबा डिसोजा दाम्पत्याकडून पुरवण्यात योतो. आपल्या रियल इस्टेटच्या व्यवसायातून साठवलेला निधी ते या कामासाठी वापरतात. 100 हून अधिक वय असलेल्या वृद्धांनाही या दाम्पत्याकडून डबा पोहोचवला जातो.

- Advertisement -

“या परिसरात आमच्या शेजारीच अनेक निराधार वृद्धांचा त्यांच्या पाल्यांकडून होणारा छळ आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा झाली. या निराधार वृद्धांना दररोज दोन घास व्यवस्थित मिळावेत, म्हणून दिवसातून दोनदा जेवणाचे डबे पुरविण्याचे सामाजिक काम हाती घेतले आहे. हे काम सुरु केले तेव्हा पाच ते सहा लोकांना रोजचा डबा दिला होता. मात्र पाच वर्षांनंतर आज दररोज आम्ही ६६ लोकांना नियमित जेवणाचा डबा देतो.” असे मार्क यांनी सांगितले.

मार्क यांच्या पत्नी ईव्हॉन डिसोजा (५७) या ही या कामात हातभार लावतात. पहाटे लवकर उठून डब्याचे जेवण शिजवणे आणि ते दुपारी ११ पर्यंत डब्यात भरण्याची जवाबदारी ईव्हॉन यांची आहे. आपल्या पतीने घेतलेल्या निर्णयाच्या बरोबर जाऊन ईव्हॉन यांनी डब्बे पोहोचवायच्या कार्यामध्ये मार्क यांना मदत करण्यास सुरुवात केली. मात्र कालांतराने लोकांची संख्या वाढल्यामुळे आता त्यांना या कामासाठी घरात एक मावशीला मदतनीस म्हणून ठेवावे लागले. तरीही ईव्हॉन या आजही जेवण शिजवण्यामध्ये सहभाग घेतात.

- Advertisement -

या बद्दल सांगतांना ईव्हॉन म्हणाल्या की, “ज्यावेळी माझ्या पतीने डबे देण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी त्यांच्या सोबत होते. मात्र आमच्याकडून किती दिवस ही सेवा लोकांना मिळेल याची शाश्वती मला नव्हती. मात्र तरीही आम्ही हे कार्य सुरुच ठेवले. कालांतराने लोकांचाही आशीर्वाद आम्हाला मिळत गेला आणि अडचणींवर मात करत आम्ही सलग पाच वर्षे डबे पोहोचवत आलो आणि या पुढेही ही सेवा अशीच सुरु ठेवणार.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -