घरमुंबईMetro 5 : छत्रपतींचा पुतळा आणि ऐतिहासिक ओक टॉवर दुसरीकडे हलवणार

Metro 5 : छत्रपतींचा पुतळा आणि ऐतिहासिक ओक टॉवर दुसरीकडे हलवणार

Subscribe

मेट्रो ५ च्या मार्गिकेसाठी कल्याणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा आणि ऐतिहासिक ओक टॉवर स्थलांतरित करावा लागणार असल्याचं एमएमआरडीएनं स्पष्ट केलं आहे.

ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो ५ मार्गिकेत कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शहराचा मानबिंदू असलेला प्रभाकर ओक टॉवर हलवावा लागणार असल्याची कबुली एमएमआरडीएने दिली आहे. मात्र, एका बिल्डरच्या हितासाठी शिवरायांच्या पुतळयाचे स्थलांतर होणार असल्याचा आरोप जागरूक नागरिक संघाने केला आहे. मेट्रोचा मार्ग बदला, पण कल्याणचा मानबिंदू असलेल्या या दोन्हींचे स्थलांतर होऊ देणार नाही. अन्यथा त्या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघाने घेतला आहे.

कल्याण शहरातील नियोजित दुर्गाडी किल्ला ते सहजानंद चौक ते शिवाजी चौक मार्गे कृषी उत्पन्न बाजार समिती असा मेट्रो ५ चा मार्ग आहे. मात्र, या मार्गिकेमध्ये शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि प्रभाकर ओक टॉवर स्थलांतरीत करावे लागणार आहे. त्यामुळे हा मार्ग दुर्गाडी किल्ला ते आधारवाडी चौक ते खडकपाडा चौक ते बिर्ला कॉलेज परिसर असा मार्ग प्रस्तावित करण्याची मागणी जागरूक नागरिक संघाने एमएमआरडीएकडे केली हेाती. तसेच या मार्गिकेबाबत जागरूक नागरिक संघाने काही अडचणींसंदर्भात एमएमआरडीएसोबत पत्रव्यवहार केला होता.

- Advertisement -

मार्गात बदल होणार नाही!

ज्या भागातून हा मार्ग प्रस्तावित आहे, त्याची मंजूर नकाशात रूंदी २४ मीटर दाखवण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात ही रुंदी १८ ते २० मीटर एवढी आहे, असेही निदर्शास आणून देण्यात आले होते. मात्र या मार्गिकेमध्ये शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि प्रभाकर ओक टॉवर स्थलांतर करण्याबाबत महापालिकेसोबत समन्वय साधून बांधकाम कालावधी दरम्यान योग्य तो निर्णय घेण्याचे नियोजन आहे, असे एमएमआरडीएने जागरूक नागरिक संघाला कळविले आहे. तसेच या मार्गात कोणताच बदल करणे शक्य नसल्याचेही एमएमआरडीने म्हटले आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि प्रभाकर ओक टॉवर हे शहराचे मानबिंदू आहेत. त्यामुळे त्यांचे स्थलांतर कल्याणकर करू देणार नाहीत, त्याला तीव्र विरोध करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे जागरूक नागरिक संघाचे श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले.

असा आहे मार्ग…

ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो प्रकल्पाची एकूण लांबी २४.७ किमी इतकी असून त्यात एकूण १७ स्थानके नियोजित आहेत. दोन स्थानकांमधील अंतर सरासरी दीड किमी इतके असणार आहे. या प्रकल्पाच्या कल्याण एपीएमसी या पहिल्या स्थानकापासून कापूरबावडी या अंतिम स्थानकाच्या प्रवासासाठी ५० मिनिटे लागणार आहेत. तसेच भिवंडीपासून ते कापूरबावडी या अंतिम स्थानकापर्यंत प्रवासासाठी साधारण २५ मिनिटेच लागणार आहेत. या प्रकल्पाच्या स्थापत्य कामासाठी कंत्राटदाराची, सामान्य सल्लागाराची आणि संकल्पचित्र सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून सप्टेंबर २०१९ मध्ये प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -