घरमुंबईआचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर होर्डिंगबाजीला उधाण

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर होर्डिंगबाजीला उधाण

Subscribe

भाजप- सेनेचा कार्यक्रमांचा धडाका

मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या राजकीय होर्डिंग्जबाजीविरोधात न्यायालयाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. होर्डिंग्ज मुक्त मुंबईसाठी न्यायालयाने आदेश दिले आहेत. पण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांकडून आपल्या कामांची माहिती देणार्‍या पोस्टर्सची गर्दी शहरात वाढल्याचे दिसून आले आहे. इतकेच नव्हे तर काही दिवसांतच आचासंहिता जाहीर होणार असल्याने अनेक खासदार आणि आमदारांनी आपल्या कामांचा शुभारंभ करण्याची घाई करताना त्यासंदर्भातील पोस्टर्स मुंबईत सर्वत्र झळकविल्याने मुंबईत सध्या होर्डिंग्जची वाढती गर्दी मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरली आहे. याविरोधात आता अनेक मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली असतानाच पालिका प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आचारसंहितेपूर्वी त्या त्या मतदारसंघातील कामांचा शुभारंभ करून त्यांची माहिती मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी पक्षांनी रणनिती आखली आहे. यासाठी प्रामुख्याने इच्छुकांसह सत्ताधारी आणि विरोधकांकडून डिजिटल बॅनरबाजीला महत्व दिले जाते. त्यानुसार मुंबईत विविध भागांत सध्या या डिजिटल होर्डिंग्जनी डोेके वर काढले आहे. अनेक ठिकाणी तर एका मागोमाग एक अशी होर्डिंगची रांग लागल्याचे चित्र मुंबईतील कानाकोपर्‍यात दिसून येत आहेत. मुंबईत वाढत असलेल्या या होर्डिंग्जमध्ये प्रामुख्याने दादर, परळ, शीव, कुलाबा, अंधेरी, माहीम यासारख्या भागांचा समावेश आहेत. त्यात शिवसेना आणि भाजप पक्षांचा होर्डिंग्जची संख्या प्रामुख्याने अधिक असल्याचे चित्र दिसून आले आहे. या होर्डिंग्जप्रमाणे मुंबईत आता विविध ठिकाणी अनेक नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत आहे. अशावेळी अनेक बड्या नेत्यांच्या स्वागतासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून फलकबाजी करण्यात येत आहे.

- Advertisement -

बॅनर्स व्यवसाय तेजीत

या वाढत्या होर्डिंग्जमुळे एकीकडे मुंबईकर हैराण असतानाच स्थानिक होर्डिंग्ज व्यापारी मात्र तेजीत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून २० ते ३० टक्के धंदा वाढल्याची माहिती दक्षिण मुंबईतील एका बॅनर्स व्यापार्‍याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -