घरCORONA UPDATEलॉकडाऊनमध्येही मद्यविक्री; भायंदरमध्ये २ लाखांचा माल जप्त!

लॉकडाऊनमध्येही मद्यविक्री; भायंदरमध्ये २ लाखांचा माल जप्त!

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात मद्याची विक्री पूर्णपणे बंद झाल्यामुळे तळीरामांच्या दारूच्या एका घोटासाठी होणाऱ्या तळमळीचा गैरफायदा मद्य विक्रेत्यांकडून घेतला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात अवैधरित्या देशी विदेशी मद्याची विक्री अव्वाच्या सव्वा भावात राज्यातील अनेक ठिकाणी सुरु आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी भायंदर येथे नुकत्याच केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला असून स्थानिक गुन्हे शाखेने भायंदर येथून सुमारे २ लाख रुपये किंमतीच्या देशी विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे.

भायंदर पूर्व येथील गोल्डन नेक्स्ट येथील अॅक्वा फॅमिली अँड रेस्टॉरंट या ठिकाणी लॉकडाऊन सुरु असताना देशी विदेशी मद्याची चोरट्या मार्गाने विक्री होत असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. ठाणे ग्रामीण पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे यांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या पथकासह सापळा रचला. या दरम्यान पोलिसांनी एक बोगस ग्राहक अॅक्वा फॅमिली अँड रेस्टॉरंट या ठिकाणी पाठवला. या रेस्टॉरंटमध्ये देशी-विदेशी मद्य हे तीन ते चार पट किंमत घेऊन विकले जात असल्याचे कळताच पोलिसांनी या रेस्टॉरंटवर छापा टाकला असता रेस्टॉरंटचा मालक गोपी नरसय्या नायडू हा बेकायदेशीररित्या मद्याची विक्री करीत असताना मुद्देमालासह सापडला.

- Advertisement -

पोलिसांनी गोपी नायडू याला ताब्यात घेऊन बेकायदेशीररित्या साठा करण्यात आलेले देशी विदेशी मद्याचे ६० बॉक्स या ठिकाणाहून हस्तगत केले. या बॉक्समधले देशी विदेशी मद्य तसेच बिअर असा एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गोपी नायडू याच्या विरुद्ध बेकायदेशीर मद्य विक्री करीत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -