घरमुंबईसर्वांना पूर्णवेळ लोकलसाठी अजून आठ दिवस प्रतिक्षा!

सर्वांना पूर्णवेळ लोकलसाठी अजून आठ दिवस प्रतिक्षा!

Subscribe

सर्वांना पूर्णवेळ लोकल सुरू करण्यासाठी क्वारंटाईन काळाप्रमाणे १५ दिवसांचा कालावधी गृहित धरण्यात आला आहे. त्यापैकी सात दिवस झाले आहेत. या आठ दिवसांदरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. पुढील सात दिवसांतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत नसल्याचे दिसून आल्यावर सर्वांना पूर्णवेळ लोकल सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात प्रवासावरील वेळमर्यादेमुळे अनेक मुंबईकर त्रस्त आहेत. प्रवासाच्या मर्यादित अवधीमुळे मुंबईकरांना कार्यालयात वेळेवर पोहोचता येत नसल्याने सरकारच्या निर्णयाविरोधात नाराजी आहे. मुंबईकरांच्या नाराजीची दखल घेऊन लोकलच्या वेळेत बदल करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. लोकल ट्रेनसह मुंबईतील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होणे हे कोरोना रुग्णांच्या संख्येवर अवलंबून आहे. आता सर्वांसाठी लोकल खुली होऊन आठवडा उलटल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही.

- Advertisement -

लोकल सुरू करण्यासाठी गर्दीचा काळ गृहीत धरत कोरोनाच्या पुढील १५ दिवसांचा क्वारंटाईन काळ निश्चित केला जात आहे. लोकल सुरू होऊन आठ दिवस उलटले. आणखी तितक्याच काळात कोरोना रुग्णांची संख्या पडताळून पहिली जाईल. ती आटोक्यात असल्यास लोकल पूर्णपणे सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. अन्यथा अशीच परिस्थिती राहिल्यास लोकल ट्रेनचा प्रवास सध्याच्या वेळापत्रकानुसारच सुरू राहील असे सांगण्यात आले.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असलेले सुरेश काकाणी यांनीही सध्याच्या वेळापत्रकामुळे नोकरदार वर्गाची त्रेधा उडत असल्याचे मान्य केले. सध्या मुंबईतील लोकल ट्रेन सकाळी पहिल्या गाडीपासून सात वाजेपर्यंत, दुपारी १२ ते ४ या वेळेत आणि रात्री ९ नंतर सर्वांसाठी खुली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी कार्यालयांच्या वेळा बदलल्या गेल्या नसल्याचा फटका त्यांच्या हजेरीवर पडतो आहे. मुंबईचे जनजीवन अद्यापही ट्रॅकवर आलेले नाही. कुठल्याही कामासाठी बाहेर पडताना सर्वसामान्यांना ट्रेनचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -