घरमुंबईमुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर

मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर

Subscribe

अ‍ॅड. सुहास वाडकर उपमहापौर,बिनविरोध निवड झालेल्या चौथ्या महापौर

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरपदी अ‍ॅड.सुहास वाडकर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध महापौर म्हणून निवडून येणार्‍या किशोरी पेडणेकर या चौथ्या महापौर असून सातव्या महिला महापौर ठरल्या आहेत. महापौरपदी विराजमान होताच मुंबईची शान व किर्ती टिकवून ठेवण्यासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. परंतु महापौरपदासाठी भाजप तसेच विरोधी पक्षाच्यावतीने कुणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने पिठासिन अधिकारी प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांनी एकमेव उमेदवार असलेल्या किशोरी पेडणेकर यांचे नावे महापौर म्हणून जाहीर केले.

महापौर व उपमहापौरपदाची निवड झाल्यानंतर या दोघांचेही माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृहनेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे, राष्ट्वादी काँग्रेसच्या राखी जाधव, सपाचे रईस शेख यांच्यासह प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले.

- Advertisement -

पक्षप्रमुखांचा प्रथम सभागृहाबाहेर महापौरांना शुभेच्छा
आजवर महापौर व उपमहापोरपदाची निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, रश्मीवहिनी, आदित्य ठाकरे आदी सभागृहात जावून शुभेच्छा द्यायच्या. परंतु यंदाही प्रथा खंडित झाली. आमदारांची बैठक असल्याने तसेच बिनविरोध निवड झाल्याने लवकर आटोपलेली प्रक्रीयामुळे ठाकरे कुटुंबाला सभागृहात उपस्थित राहून शुभेच्छा देता आल्या नाहीत.यंदा त्यांना सभागृहाबाहेर म्हणजे महापौर दालनातील अँटीचेंबर जावून पेडणेकर आणि वाडकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अनिल देसाई,आमदार दिवाकर रावते, मिलिंद नार्वेकर,अनिल परब आदी उपस्थित होते.

चौथ्या बिनविरोध निवड झालेल्या महापौर
महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली असली तरी त्या चौथ्या अशा महापौर ठरल्या आहे. यापूर्वी १९५५-५६ नरसिंहराव पुपाला, १९५६-५७मध्ये सुलोचना मोदी, १९९८-९९मध्ये नंदू साटम आणि त्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुलोचना मोदी यांची केवळ महिन्यासाठी महापौर बिनविरोध निवड झाल्या होती. तर नंदू साटम यांची महापौर परिषदेच्या काळात बिनविरोध निवड झाली. तर सातव्या महिला महौपार ठरल्या आहेत. यापूर्वी सुलोचना मोदी, निर्मला प्रभावळकर,विशाखा राऊत, डॉ. शुभा राऊळ, श्रध्दा जाधव, स्नेहल आंबेकर या महिला महापौर बनल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -