घरमुंबईडोंबिवलीच्या तरुणाने मागितले खड्ड्यांपासून पोलीस संरक्षण!

डोंबिवलीच्या तरुणाने मागितले खड्ड्यांपासून पोलीस संरक्षण!

Subscribe

एखाद्या व्यक्तीच्या जिवाला दुसऱ्या व्यक्तीकडून धोका आहे म्हणून त्याला पोलीस संरक्षण दिल्याच्या अनेक घटना सर्वांना माहीत आहेत. पंरतु रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जिवाला धोका असल्याचे सांगत डोंबिवलीच्या एका युवकाने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

ज्या लोकांच्या जिवाला धोका आहे असे लोक, पोलीस संरक्षणाची मागणी करतात. खरंच गरज असल्यास अशा लोकांना पोलीस संरक्षण पुरवलेदेखील जाते. सेलिब्रेटी, नेते, अधिकाऱ्यांनादेखील पोलीस संरक्षण दिले जाते. असेच एका युवकाने जिवाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. संरक्षणाची मागणी करणे ही जरी साधारण बाब असली तरी, त्या युवकाने संरक्षणाची मागणी करत असताना दिलेले कारण मात्र विचित्र आहे. डोंबिवली येथील या युवकाने चक्क खड्ड्यांपासून आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. ‘रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांमधून प्रवास करत असताना आपल्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,’ असे त्याने सांगितले आहे. चिराग हरिया असे त्याचे नाव आहे. तो दररोज कामानिमित्त डोंबिवलीहून कल्याणला जातो. प्रवास करताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्याने केली आहे. तसेच पोलीस संरक्षण दिल्यास त्याबदल्यात पैसे मोजण्याची तयारीही स्टॉक ब्रोकर असलेल्या हरिया याने दाखवली आहे. यासंर्भात मुंबई मिररने वृत्त प्रकाशित केले आहे.

स्थानिक लोक भीतीच्या छायेत 

चिराग कामानिमित्त डोंबिवली-कल्याणदरम्यान ज्या मार्गावरुन जातात त्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. यापैकी दोन अपघातांमध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यूही ओढवला आहे. मृतांमध्ये एका ५ वर्षांच्या मुलाचा आणि महिलेचा समावेश आहे. या रस्त्यांवर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचा वापर करणारे भीतीच्या छायेत आहेत. ये-जा करताना अपघाताची भीती वाटत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वारंवार होणाऱ्या या अपघात व रस्त्यांवरच्या खड्ड्यांना वैतागून अखेर हरियाने पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली. त्याने ८ जुलै रोजी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये याबाबत लेखी अर्ज दाखल केला आहे.

- Advertisement -

पोलीस अचंबित

चिराग हरिया याने पोलीस संरक्षणाची मागणी करताना जे कारण दिले आहे, ते ऐकून पोलीस हैराण झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी चिरागचा अर्ज पोलीस उपायुक्तांकडे दिला. उपायुक्तांनी अद्याप यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. हरियाला आता उपायुक्तांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.

संरक्षण पुरवल्यास पैसे देण्यासही तयार

हरिया यांचे म्हणणे आहे की, ‘प्रवासासाठी हा रस्ता अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे मी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. संरक्षण पुरवल्यास मी पैसे देण्यासही तयार आहे. पावसाचे पाणी रस्त्यांवर साचते तेव्हा खड्डे पाण्याने भरतात व त्यामुळे खड्डा लपतो. चिखल, माती, कचरा या खड्ड्यात साचतो. त्यामुळे नेमका खड्डा कुठे आहे? खड्डा किती मोठा आहे? याचा अंदाज लावणे अशक्य असते. यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -