केंद्रीय यंत्रणांमार्फत कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी करा

आमदार गीता जैन यांचे राष्ट्रपतींना पत्र

आमदार गीता जैन यांचे राष्ट्रपतींना पत्र

महाराष्ट्रात विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावला जात असून ठिकठिकाणी धाडसत्र आणि अटकसत्र सुरू आहे. त्यामुळे दूषित वातावरण तयार झाल्याचा आरोप करत मीरा-भाईंदरच्या शिवसेना आमदार गीता जैन यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून स्वतः च्या आणि कुटुंबीयांच्या व्यवसायासह मालमत्तेची चौकशी केंद्रीय यंत्रणेमार्फत करण्याची मागणी केली आहे.

भाईंदर ग्रामपंचायत सरपंच, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि राजस्थानमधील पाली लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेले सासरे मिठालाल जैन यांनी काँग्रेस सोडल्यानंतर केंद्र सरकारने प्राप्तिकर विभागाचा ससेमिरा मागे लावला होता. आताही आपणाला मीरा-भाईंदर शहरात काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपली आणि कुटुंबीयांची व्यावसायिक प्रतिमा मलीन करण्याचा, बदनाम करण्याचा घाणेरडा खेळ काही लोक वारंवार करीत आहेत. म्हणूनच केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार गीता जैन यांनी केली आहे. चौकशीत कुटुंबीय दोषी आढळल्यास कुटुंबीय राजकारणाचा त्याग करेल आणि सर्व कारवायांना समोरे जातील, असेही आमदार जैन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

गीता जैन भाजपच्या तिकिटावरून निवडून आलेल्या अद्यापही नगरसेविका असून त्यांनी भाजपच्या महापौर म्हणून काम केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या जैन यांनी तेव्हाचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. सध्या जैन यांची शिवसेनेशी जवळीक आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत त्या मीरा-भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात सातत्याने आवाज उठवत असतात. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा पाठी लागण्याआधीच जैन यांनीच चौकशीची मागणी केली आहे.