घरताज्या घडामोडीमहापौर निवास ताब्यात घेऊन बाळासाहेबांचे स्मारक न करणे, याला टाइम पास म्हणतात...

महापौर निवास ताब्यात घेऊन बाळासाहेबांचे स्मारक न करणे, याला टाइम पास म्हणतात – मनसे

Subscribe

मनसे आणि शिवसेनेत विरंप्पन गॅंग विरूद्ध टाईमपास टोळी असा वाद एकीकडे उफाळलेला असतानाच आज शुक्रवारी सकाळीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून थेट बाळासाहेबांच्या स्मारकाच्या विषयावरून शिवसेनेला टार्गेट केले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचा रखडलेल्या विषयाच्या निमित्ताने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मनसेने याआधीच म्हणजे गुरूवारी फेरीवाल्यांकडून होणाऱ्या वसुलीचा विषय हा विरप्पन गॅंगचा कारनामा सांगत एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये शिवसैनिकांकडून मुंबईभर कशा पद्धतीने समांतर यंत्रणा उभारून सर्वसामान्य फेरीवाल्यांकडून पैसे उकळण्याचा सपाटा लावण्यात आला आहे असा आरोप शिवसैनिकांवर केला होता. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी चंबळ खोऱ्यातील राज्य मुंबईत आले काय असाही सवाल या पत्रकार परिषदेदरम्यान केला होता. तसेच या फेरीवाल्यांकडून पैसे वसुलीच्या मुद्द्याची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली होती. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला उल्लेख टाईमपास टोळी असा केला होता.  मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनीही गुरूवारीच या विषयावर तीन ट्विट करत मनसेकडून आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या टिप्पणीवर उत्तर दिले होते.

काय आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांचे ट्विट ?

शिवसेनेचा उल्लेख विरप्पन गॅंग असा मनसेकडून करण्यात आला होता. त्यांना मनसेला टाईमपास टोळी असे शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे संबोधण्यात आले. मनसेकडून गुरूवारपासूनच यावर प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. मनसे हा पक्ष आहे की संघटना आहे असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी केला होता. आज सकाळीच मनसे नेते संदीप देशपांडे ट्विट करत म्हटले आहे की, ”सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करण याला टाइम पास म्हणतात.”

- Advertisement -

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्दयावर शिवसेनेला टार्गेट करत थेट महापौर निवास येथे रखडलेल्या बाळासाहेबांच्या स्मारकाची आठवण करून दिली आहे. बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्याच्या ठिकाणी करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शिवसेना आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यामध्ये स्मारकाच्या आराखड्याच्या मुद्द्यावर आणि स्मारकाच्या उभारणीस येणाऱ्या खर्चाच्या निमित्ताने चर्चेच्या अनेक फेऱ्या आतापर्यंत झाल्या आहेत. पण प्रत्यक्ष कामाला मात्र अद्यापही सुरूवात झालेली नाही.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -