Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेऊन सर्वसाधारण लोकल प्रवासाचा निर्णय

वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेऊन सर्वसाधारण लोकल प्रवासाचा निर्णय

अति. आयुक्त काकाणी यांचे सुतोवाच, १५ दिवसांचा कालावधी संपणार २२ फेब्रुवारीला

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण प्रवाशांसाठी लोकलचा प्रवास खुला करायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सुतोवाच मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

मर्यादित वेळेसाठी सर्वसाधारण प्रवाशांसाठी लोकल सेवा खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आपण 15 दिवसांचा लोकल मर्यादित प्रवासाचा कालावधी ऑब्जर्व्हेशनसाठी गृहित धरला आहे. तो 21 – 22 तारखेला संपुष्टात येणार आहे. यादरम्यान आम्ही पुन्हा रुग्ण संख्येचा आढावा घेऊ आणि त्यानंतरच सर्वसामान्यांच्या प्रवासाचा निर्णय होईल, असे सुरेश काकाणींनी स्पष्ट केले. काकाणी पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

मुंबई महापालिका आणि आजूबाजूच्या महापालिका विचारात घ्याव्या लागतील आणि नंतर त्यासंदर्भातील शिफारस, मुद्दे राज्य शासनाला उपलब्ध करून देऊ , त्यानंतरच सर्वसामान्य प्रवाशांना पूर्णवेळ लोकल प्रवासाचा निर्णय घेता येईल, असे काकाणींनी स्पष्ट केले. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला 16 जानेवारीत सुरुवात झाली होती. एका महिन्यात दुसर्‍या टप्प्याला सुरुवात करू शकलो. सुरुवातीला कोविड अ‍ॅपमध्ये थोड्या अडचणी होत्या; पण बाकी लोकांना आपण डोस देतोय. 23 केंद्रांत लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल सुरू केल्यामुळे रुग्ण संख्या वाढली, असं म्हणता येणार नाही. हवाई वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. मोजक्या शहरातून किंवा मोजक्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होती. त्यांची संख्याही वाढली आहे. प्रवाशांची आपण आरटीपीसीआर चाचणी करतो. डोमेस्टिकमध्ये सुरुवातीला 4 राज्यांतील चाचण्या केल्या जात होत्या. आता 5 राज्यांतून येणार्‍या प्रवाशांच्या आपण चाचण्या करतो. लोकल प्रवाशांची संख्या वाढतेय, अशा वेळी सगळ्यांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे, असेही काकाणी यांनी म्हटले. काळजी घेतली नाही तर त्रास होईल. सध्या लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात चर्चा नाही. आपण आखून दिलेल्या कार्यक्रमाचे पालन केले, तर आजारापासून आपण सुरक्षित राहू शकतो, असे काकाणी यांनी नमूद केले.

खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू

- Advertisement -

लसीकरणाच्या मोहिमेत तिसर्‍या टप्प्यात खासगी रुग्णालयांची गरज भासणार आहे, त्याची पूर्वतयारी म्हणून त्या त्या खासगी रुग्णालयातील कर्मचार्‍यांना लसीकरणाची परवानगी आम्ही दिलेली आहे. या लसीकरणात 20 खासगी रुग्णालयांचा सहभाग आहे. या रुग्णालयांची तपासणी पूर्ण केलेली आहे. त्यांच्या कर्मचार्‍यांना आज आणि उद्या आम्ही प्रशिक्षण देणार आहोत. ज्यांना प्रशिक्षण दिले जाईल त्यांना लस देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. परवापासून त्यांच्या कर्मचार्‍यांना लसीकरणास प्रारंभ होऊ शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील जी मोठी रुग्णालये आहेत, ज्यात त्यांच्याकडे वेटिंग रूम, लसीकरण रूम, ऑब्जर्व्हेशन रूम, पुरेसे मनुष्यबळ असेल, लस साठवणुकीसाठी व्यवस्था असेल, अशा रुग्णालयांना परवानगी देण्याची व्यवस्था आपण केलीय, अशी माहिती काकाणी यांनी दिलीय.

- Advertisement -