Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! तुळसी तलाव भरून वाहू लागला

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! तुळसी तलाव भरून वाहू लागला

Related Story

- Advertisement -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेला ‘तुळशी’ तलाव शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे. या तलावाची पाणीसाठवण क्षमता अगदीच कमी म्हणजे फक्त ८०४६ दशलक्ष लीटर इतकी आहे; मात्र तलाव भरल्याने मुंबईकरांसाठी पहिली आनंदाची बातमी आज मिळाली आहे. त्यामुळे थोडासा का होईना मुंबईला पाण्याबाबत दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा तलाव भरून वाहू लागला होता. तर २०१९ मध्ये १२ जुलै रोजी, २०१८ मध्‍ये ९ जुलै रोजी, २०१७ मध्‍ये १४ ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष २०१६ मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता. वास्तविक, १३ जुलै मंगळवारी रोजी सकाळी ६ पर्यंत तुळशी तलावांत ८३ टक्के म्हणजे ६ हजार ६८६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला होता; मात्र या तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडल्यामुळे अवघ्या चार दिवसांतच हा तलाव भरून वाहू लागला आहे.

- Advertisement -

मुंबईला ठाणे जिल्हा परिसरातील तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा या पाच प्रमुख व पाणी साठवण क्षमता जास्त असलेल्या तलावांमधून मोठया प्रमाणात पाणीपुरवठा होत असतो. तर त्या तुलनेत मुंबईतील पूर्व उपनगरातील भांडुप संकुल परिसरातील विहार तुळशी या दोन खूप कमी क्षमता असलेल्या तलावांमधून कमी पाणीपुरवठा होतो. मुंबईला या सात तलावांमधून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तर पावसाळा संपल्यानंतरपासून पुढील वर्षभर मुंबईला विना पाणीकपात पाणीपुरवठा होण्यासाठी या सात तलावांत मिळून १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात तलावांमधून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.

तुळशी तलावाबाबत अधिक माहिती

तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) इतक्या पाण्‍याचा पुरवठा करण्यात येतो. तुळशी तलाव हा मुंबई महापालिका मुख्यालयापासून अंदाजे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) दूर अंतरावर आहे. इंग्रजांच्या काळात तब्बल ४० लाख रुपये खर्चून हा तुळशी तलाव ( कृत्रिम तलाव) १८७९ मध्ये बांधून पूर्ण करण्यात आला. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) एवढा असतो. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते. तसेच, विहार तलाव भरून वाहू लागला तर त्याचे वाहते पाणी मिठी नदीच्या पात्रात जाऊन मिळते.

- Advertisement -