आता राणीच्या बागेत वाघ व पेंग्विनच्या बछड्यांची अनुभवा धमाल मस्ती

राणीच्या बागेत भेट देणाऱ्या पर्यटकांना या वाघ - वाघिणीच्या दोन आणि पेंग्विनच्या तीन बछड्यांची धमाल मस्ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे.

tiger and penguin calves in the Rani chi Baugh
tiger and penguin calves in the Rani chi Baugh

भायखळा येथील राणीच्या बागेत मे महिन्याच्या सुट्टीत भेट देणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढत आहे. राणीच्या बागेतील शक्ती वाघ आणि करिश्मा वाघीण या रॉयल बेंगॉल टायगरच्या जोडीने सहा महिन्यांपूर्वी जन्म दिलेले ‘जय’ आणि ‘रुद्र’ हे दोन बछडे काहीसे मोठे झाले आहेत. तर पेंग्विन कक्षातील पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक अशा तीन पिलांना जन्म दिला असून तेसुद्धा आता काहीसे मोठे झाले आहेत. आता राणीच्या बागेत भेट देणाऱ्या पर्यटकांना या वाघ – वाघिणीच्या दोन आणि पेंग्विनच्या तीन बछड्यांची धमाल मस्ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे. ( Now experience the great fun of tiger and penguin calves in the Rani chi Baugh )

मुंबई महापालिकेच्या राणीच्या बागेत रमणाऱ्या रॉयल बेंगॉल टायगरच्या जोडीने म्हणजेच ‘शक्ती आणि करिश्मा’ने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी दोन बछड्यांना जन्म दिला होता, तर पेंग्विन कक्षातही पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन गोंडस पेंग्विन पिले जन्माला घातली होती. या नव्या पाहुण्यांची बातमी पर्यटकांच्या कानी पडली होती त्यामुळे त्यांना बघण्याची उत्कंठा वाढली होती. आता या गुरुवारपासून म्हणजे ११ मे २०२३ पासून पर्यटक या नवीन पाहुण्यांची धमाल मस्ती अगदी जवळून पाहू शकतील आणि त्यांचा आनंद लुटू शकणार आहेत.

राणीच्या बागेत पेंग्विन व वाघांचे आगमन झाल्यापासून पर्यटकांची गर्दी पूर्वीपेक्षा जास्त वाढू लागली आहे. विशेषतः पेंग्विनची संख्या वाढत असल्याने त्यांना बघण्यासाठी बच्चे कंपनी खास आग्रही असते.

जय आणि रुद्र उमटवत आहेत ठसे

छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातून १२ फेब्रुवारी २०२० रोजी शक्ती वाघ (वय ७ वर्षे) आणि करिश्मा वाघीण (९ वर्षे) या जोडीला भायखळा येथील राणीच्या बागेत आणण्यात आले होते. करिश्मा वाघीणीने गतवर्षी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी दोन रुबाबदार नर बछड्यांना जन्म दिला. आता या दोन्ही बछड्यांचे वय ६ महिने आणि ७ दिवस आहे. दोन्ही बछडे त्यांच्या आवारात फेरफटका मारत असतात. पुढील दीड ते दोन वर्षे या बछड्यांना करिश्मासोबतच ठेवण्यात येणार आहे. तसेच जो मांसाहार करिश्माला पुरविला जात आहे तोच जय आणि रुद्रला दिला जात आहे. हे बछडे आणि करिश्मा तळ्यात आणि हिरवळीवर सैर करतात. आता पर्यटकांना एक दिवसाआड जय आणि रुद्रसह करिश्माला तर दुसऱ्या दिवशी शक्तीला पाहण्याचा आनंद घेता येणार आहे, असे उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उप अधीक्षक तथा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राऊळ यांनी कळविले आहे.

पेंग्विन कक्षात डोरा, सिरी, निमो मुंबईकारांच्या भेटीला

राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षातील पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक अशा तीन पिलांना जन्म दिला आहे. त्यामुळे पेंग्विनची संख्या वाढून आता एकूण १५ झाली आहे. पेंग्विन कक्षात सध्या नर आणि मादी अशा चार जोड्या आहेत. त्यात डोनाल्ड आणि डेझी या जोडीने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी डोरा (मादी), मोल्ट आणि फ्लिपर या जोडीने २ ऑक्टोबर २०२२ रोजी सिरी (मादी) तर पपाय आणि ऑलिव्ह या जोडीने १३ डिसेंबर २०२२ रोजी निमो (नर) अशा तीन पिलांना जन्म दिला. ओरिओ आणि बबल या पेंग्विन जोडीला अद्याप पिलांची प्रतीक्षा आहे.

( हेही वाचा: मेट्रो -३ मार्ग यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार; मुख्यमंत्री शिंदे यांच्यांकडून प्रकल्पाची पाहणी )

डोरा, सिरी आणि निमो यांचा मच्छीवर ताव

पेंग्विन कक्षातील डोरा, सिरी आणि निमो यांची देखभाल करणारे डॉ. मधुमीता काळे आणि त्यांचे वैद्यकीय पथक मायेची उब देत आहे. या पिलांना मासे आणि बोंबील आहारात देण्यात येत आहेत. ते मच्छीवर चांगलाच ताव मारत आहेत. ही पिले लहान होती तेव्हा त्यांचे आई-वडीलच त्यांना भरवत होती, मात्र आता ही पिले स्वतः तळ्यात आणि तळ्याकाठी बागडत असतात. डोरा, सिरी आणि निमो यांना देखील पाहणे आता पर्यटकांना शक्य होणार आहे.