घरमुंबईवातानुुकूलित यंत्रणा नसल्याने औषधे निष्प्रभ

वातानुुकूलित यंत्रणा नसल्याने औषधे निष्प्रभ

Subscribe

मेडिकल स्टोअर्सकडून रुग्णांची फसवणूक !

तापमान                                    औषध
2 ते 8 डिग्री सेल्सिअस             अँटिटॉक्सिन, व्हॅक्सिन, इन्सुलिन
10 ते 25 डिग्री सेल्सिअस          अँटिबायोटिक

मुंबईसह महाराष्ट्रातील 95 टक्के मेडिकल स्टोअर्समध्ये वातानुकूलित यंत्रणा नसल्याने आणि मोठ्या प्रमाणातील औषधांच्या साठ्यासाठी फ्रिज अपुरे पडत असल्यामुळे बहुतांश औषधांची परिणामकारकता कमी होत आहे. मेडिकल स्टोअरमध्ये थंड जागेऐवजी सर्वसामान्य तापमानात औषधे ठेवण्यात येत असल्याने औषधांची मुदत संपलेली नसली तरी त्याची परिणामकारकता कमी होते.

- Advertisement -

अनेक औषधे 2 ते 25 डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात ठेवावी असा नियम आहे. तशा सूचना औषधांच्या पाकिटावर उत्पादक कंपनीकडून छापण्यात येतात. जेणेकरून शरीरातील रोगाला रोखण्यासाठी औषधामध्ये असलेले महत्त्वपूर्ण घटक कायम राहण्यास मदत होते. परंतु, मुंबईसह राज्यातील सर्वच मेडिकल स्टोअर्समध्ये हा नियम सर्रास धाब्यावर बसवण्यात येतो. राज्यात 50 हजारांपेक्षा जास्त किरकोळ विक्रेते असून 20 हजारांपेक्षा जास्त मोठे व्यापारी आहेत. यातील 95 टक्के विके्रते आणि व्यापार्‍यांकडे औषधे ठेवण्याच्या जागेत कोणतीही वातानुकूलित यंत्रणा नाही. किरकोळ विक्रेते औषधे ठेवण्यासाठी साधा फ्रिज किंवा आईस पॅकचाही वापर करत नाहीत. औषध निर्मिती कंपनी आणि डिस्ट्रिब्युटरकडे वातानुकूलित यंत्रणा असल्याने तेथे हा प्रश्न उद्भवत नाही. परंतु डिस्ट्रिब्युटरकडून डीलर आणि तेथून दुकानदारांकडे औषधांच्या होणार्‍या प्रवासात कोणतीही वातानुकूलित यंत्रणा नसते. मेडिकल स्टोअरमध्येही वातानुकूलित यंत्रणा आणि फ्रिज नसल्याने औषधे थंड जागेत ठेवण्याची सूचना सर्रास दुर्लक्षित केली जाते.

डीलर आणि बहुतांश मेडिकल स्टोअर्समध्येही वातानुकूलित यंत्रणा आणि फ्रिज नसल्याने औषधांमधील काही महत्त्वाचे घटक तापमानामुळे कमी होतात. मुंबईतील तापमान हे 35 अंश सेल्सिअस असते. रुग्ण डॉक्टरकडे जाऊन औषध बदलून घेतात. पण औषधाचा परिणाम होत नाही. डीलर व मेडिकल स्टोअरच्या मालकांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक आर्थिक फटका सहन करावा लागतो, अशी माहिती ऑल फुड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे (एएफएडीएलएचएफ) राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली.

- Advertisement -

मुंबईमध्ये दक्षिण मुंबई वगळता पूर्व व पश्चिम उपनगरातील बहुतांश दुकानात फ्रिज व वातानुकूलित यंत्रणा नाही. तसेच ठाणे, नवी मुंबईतील मोठे मेडिकल स्टोअर्स वगळता कोणाकडेही फ्रिज आणि वातानुकूलित यंत्रणा नसते. तसेच ग्रामीण भागांमध्ये सतत विजेचा पुरवठा नसल्याने मेडिकल स्टोअर्सचे मालक फ्रिज ठेवत नाहीत. पण त्यांनी आईस पॅक ठेवल्यास औषधांचा दर्जा कायम राखण्यास मदत होऊ शकते. परंतु तसेही कोणताच विक्रेता करताना दिसत नाही, असे अभय पांडे यांनी सांगितले.

प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये वातानुकूलित यंत्रणा ( एसी) असावा असा नियम काही वर्षांपूर्वी अन्न आणि औषध विभागाने महाराष्ट्रापुरता केला होता. मात्र गावोगावी कायम वीज पुरवठा करणे शक्य नसल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला होता.
परंतु 8 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानातील औषधे मेडिकल स्टोअरमध्ये ठेवण्याची परवानगी हवी असल्यास फ्रिज बंधनकारक करण्यात आला आहे. त्याशिवाय परवाना देण्यात येत नाही, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त (औषध) अमृत निखाडे यांनी दिली.

कोणत्याही अँटिबायोटिक औषधाचा डोस किमान काही दिवस घेणे आवश्यक असतो. परंतु औषधाचा परिणामच होत नसल्याने रुग्ण डॉक्टरकडून औषध बदलून घेतात. औषधांमधील महत्त्वाच्या घटकांचा परिणाम कमी झाल्याने त्याचा आजार बरा होण्यासाठी उपयोग होत नाही. तसेच औषध लगेच बदलल्याने त्या औषधाचा परिणाम पुढील वेळी होत नसल्याने अधिक क्षमतेचे औषध घ्यावे लागते. दरवेळी हा प्रकार घडत असल्याने एक वेळ अशी येईल की कोणतेच औषध रुग्णांवर परिणाम करणार नाही. त्यावेळी काय होईल, असा प्रश्न डॉ. सागर मुंदडा यांनी उपस्थित केला आहे.

औषधांचा दर्जा राखण्यासाठी काय करता येईल

*आवश्यक तेवढीच औषधे मेडिकल स्टोअर्सनी मागवावीत.
*फ्रिज किंवा वातानुकूलित यंत्रणा असणार्‍या मेडिकल स्टोअर्सनाच अँटिबायोटिक औषधे ठेवण्याची परवानगी द्यावी.
*नागरिकांनी औषधे फ्रिजमध्येच ठेवावीत.
*ग्रामीण भागातील मेडिकल स्टोअर चालकांनी आईस पॅकचा वापर करावा.

औषध थंड जागेत ठेवण्याबाबत औषधाच्या पाकिटावर दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. थंड जागेऐवजी बराच काळ औषधे सर्वसाधारण तापमानात राहिल्यास त्याची परिणामकारकता कमी होते. त्यामुळे अँटिबायोटिकसारख्या औषधांचा कोणताच परिणाम होत नाही.
– डॉ. अविनाश सुपे, माजी अधिष्ठाता, केईएम हॉस्पिटल

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -