घरCORONA UPDATEमध्यवर्ती रुग्णालयाने उपचारास नकार दिलेल्या महिलेची घरातच प्रसुती

मध्यवर्ती रुग्णालयाने उपचारास नकार दिलेल्या महिलेची घरातच प्रसुती

Subscribe

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका गर्भवती महिलेला प्रसुतीकळा होत असताना मध्यवर्ती रुग्णालयात आणल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यासाठी नकार दिला गेला.

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एका गर्भवती महिलेला प्रसुतीकळा होत असताना मध्यवर्ती रुग्णालयात आणल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यासाठी नकार दिला गेला. तसेच तिला हाकलून देखील दिले गेले. अशा अवस्थेत या महिलेला घरी आणले. अखेर घरातच तिची प्रसूती करण्यात आली आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे रुग्णालयात दाखल होण्यासाठी ही महिला तिच्या पतीसह दोन किलोमीटर पायी चालत आली होती. त्यानंतर रुग्णालयातून हाकलल्यानंतर देखील घरापर्यंत पायीच परत गेली.

उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालय लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सतत वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारण लॉकडाऊन पासून सर्वसामान्य नागरिकांवर उपचार करण्यास रुग्णालय प्रशासन टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी शहरातील जेष्ठ पत्रकार रामेश्वर गवई यांची मुलगी प्रणाली गवई हिच्यावर उपचार करण्यात मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टर्सनी दिरंगाई केल्यामुळे तिचे निधन झाल्याचा आरोप रामेश्वर गवई यांनी केला होता. या घटनेनंतर गर्भवती महिलेची ही घटना समोर आली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

उल्हासनगर – ३ येथील सम्राट अशोकनगर परिसरात २६ वर्षीय महिला तिच्या कुटुंबियांसह राहते. ही महिला गर्भवती होती. काल दुपारच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्याने त्यांनी रुग्णालयात जाण्याचे ठरवले. मात्र लॉकडाऊनमुळे रिक्षा उपलब्ध नसल्याने ती पतीसह दोन किलोमीटरपर्यंत पायी चालत मध्यवर्ती रुग्णालयात गेली. परंतू तेथील डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल तर केले नाही उलट हाकलून लावले. त्यानंतर हे पती-पत्नी घरी पायी चालत परत आले. संध्याकाळच्या सुमारास पुन्हा महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या. यावेळी अतितात्काळ रुग्णांसाठी उल्हासनगर रेल्वे स्थानकजवळ ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील एका रिक्षाचालकाला बोलवण्यात आले. या रिक्षात बसवून महिलेला पुन्हा मध्यवर्ती रुग्णालयात आणले गेले. मात्र डॉक्टरांनी तिला प्रसुतीसाठी वेळ आहे, असे सांगून पुन्हा घरी पाठवले. घरी आल्यानंतर तिला वेदना असह्य होऊ लागल्या. शेजारच्या ज्येष्ठ महिला तिच्या मदतीला धावून आल्या आणि त्यांच्या मदतीने ही महिला घरीच प्रसूत झाली. तिने गोंडस बाळाला जन्म दिला.

यानंतर या महिलेची नाळ कापणे आणि पुढील औषधोपचार मिळावे म्हणून तातडीने स्थानिक समाजसेवक शिवाजी रगडे यांच्या मदतीने पुन्हा महिलेला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले, रगडे यांनी रुग्णालय प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करून यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडे तक्रार केली आहे. या संदर्भात मध्यवर्ती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुधाकर देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्या वेळेस महिला रुग्णालयात अली तेव्हा डॉक्टर्सची महत्वाची मिटिंग सुरू होती. कदाचित त्यावेळेस शिकाऊ डॉक्टर्सला विचारणा केल्यामुळे हा प्रकार घडला. सध्या ही महिला आणि बाळ सुखरूप असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात येत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

‘राज’ पुत्राचा मदतीचा हात, मार्डला पीपीई किट्स, मास्कची मदत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -