कोविड केंद्रांमध्ये रोबो करणार रुग्णांची सेवा

robo

कोरोना रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी वरळी, बीकेसी व गोरेगाव येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांना दाखल करण्यात आल्याने अनेकांना सहज उपचार मिळाले. पण आता वरळी आणि बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी रोबो दाखल झाले आहेत. हे रोबो रुग्णांना जेवण, औषधे देण्याबरोबरच त्यांची तपासणीही करणार आहेत. त्यामुळे सेंटरवरील कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण आता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आगामी काळात ही कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते. मात्र, यामुळे कर्मचार्‍यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी रोबो आणण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. एका आठवड्यापूर्वी वरळी आणि बीकेसीतील कोविड केंद्रात रोबोने काम करण्यास सुरुवात केली. अन्न, पाणी आणि औषधे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याच्या व्यतिरीक्त रुग्णांना टेलीमेडिसीन आणि त्यांचे पल्स ऑक्सीमीटर तपासणे, सर्व विभाग सॅनिटायझ करणे, रुग्णांची ईसीजी काढणे अशी कामे करण्यात येत आहेत. आयआयटीच्या माध्यमातून साकारलेला रोबो दिवसाला 200 ते 250 रुग्णांची तपासणी करत आहेत. रोबोमुळे मनुष्यबळ देखील कमी लागत आहे तसेच कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांपर्यत प्रत्यक्ष नर्स आणि डॉक्टरांना देखील जाण्याची गरज कमी झाली आहे. या रोबोची आणखी एक विशेष बाब म्हणजे घर बसल्या आपल्याला आपल्या रुग्णालयात दाखल नातेवाईकाशी देखील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बोलता येणार आहे.

 

रुग्णांची वाढती संख्या आणि कर्मचार्‍यांना होणारी लागण यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता होती. परंतु रोबोच्या वापरामुळे कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झाली आहे. रोबो एक दिवसामध्ये 200 ते 250 रुग्णांची तपासणी करतात. सध्या प्राथमिक स्वरुपात रोबोचा वापर करण्यात येत आहे.
– डॉ. गौतम भंसाली, टास्क फोर्स, बीएमसी