घरमुंबईठाण्यात कोकणच्या राजाची विक्री तेजीत

ठाण्यात कोकणच्या राजाची विक्री तेजीत

Subscribe

आंब्याच्या मौसमात कोकणातील हापूसाची खवय्यांना वेगळीच भुरळ असते. मात्र कोकणात जावून आंब्याची चव चाखण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. परिणामी ठाण्यातील नौपाडा परिसरातील आंबा विक्री खवय्यांसाठी पर्वणीच ठरते.

गेले काही दिवस आंबा विक्रीवरून ठाण्यात राजकीय धुरळा उडाला. मात्र तरी कोकणचा राजा असा लौकिक असणारे हे फळ शहरातील नौपाडा, विष्णूनगर आणि गोखले रोड परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात विकले जाते. वर्षानुवर्षे ठराविक विक्रेते कोकणातील बागांमधील आंबे विकत असल्याने ग्राहकांना खात्रीने चांगल्या दर्जाचे आंबे मिळतात. त्यामुळे तीन-साडेतीन महिन्यात केवळ नौपाडा परिसरातून आंबा विक्रीतून कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे ठाणे हे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यातील एक मोठी बाजारपेठ आहे.

नौपाडा परिसरात कोट्यवधी रूपयांची उलाढाल

जुने ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोखले रोड, नौपाडा, विष्णूनगर परिसरात सध्या किमान २५ ते ३० आंबा विक्रीचे अधिकृत स्टॉल्स आहेत. प्रत्येकाने आपल्या दुकानावर देवगडचा हापूस, रत्नागिरीचा हापूस, मंडणगडचा हापूस अशी वैशिष्ट्ये ठळक अक्षरात लिहिली आहेत. ग्राहक आपल्या आवडीनुसार इथून आंबे खरेदी करतात. कोकणातून आंबा आणणे वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीचे असते. तो त्रास करण्यापेक्षा नौपाड्यातून आंबा खरेदी करणे नागरिकांना सोयीचे ठरते. पुन्हा एखादा आंबा खराब झाल्यास तो बदलूनही आणता येतो. साधारणपणे गुढी पाडव्यापासून नौपाड्यात आंबा विक्रीला सुरूवात होते. सुरूवातीच्या काळात अर्थातच दर चढे असतात. मात्र मे महिन्यात आंबा काहीसा स्वस्त झाला की मध्यमवर्गीय ग्राहक मोठ्या प्रमाणात आंबा खरेदी करतात. सध्या बाजारात २५० रूपयांपासून १३०० रूपये डझनपर्यंत आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गोखले रोडवर अमृता बोंद्रे गेली ३८ वर्षे आंबा विक्री करीत आहेत. या भागातील त्या पहिल्या आंबा विक्रेत्या. त्यांच्या कोकण मेवा या दुकानात आंब्यांबरोबरच कोकणातील इतर पदार्थही मिळतात. त्यात विविध प्रकारची लोणची, पापड, कडधान्ये, आंबापोळी, फणसपोळी, निरनिराळ्या प्रकारचे पापड, सांडगी मिरची, काजू आदी पदार्थांचा समावेश आहे.

कोकणातील भावंडं आणि मित्रमंडळींच्या बागेतील आंबे आम्ही विक्रीसाठी ठेवतो. याशिवाय कोकणात निरनिराळे बचत गट लोणची, पापड, विविध प्रकारची सरबते बनवीत असतात. आमच्या कोकण मेवा या दुकानात आम्ही ते विक्रीसाठी ठेवतो. आमचे दुकान रस्त्यावर आहे. ग्राहकांचा विश्वास आहे. आता ग्राहकांची तिसरी पिढी आमच्याकडून आंबे खरेदी करते. गुढीपाडवा ते वटपौर्णिमा आम्ही आंब्याची विक्री करतो.
अमृता बोंद्रे, कोकण मेवा, गोखले रोड, ठाणे

- Advertisement -

 

अन्न आणि औषध प्रशासनाचा जाच
बाजारात सफरचंदापासून केळ्यांपर्यंत विविध प्रकारची फळे विकली जातात. मात्र आंबे विक्री सुरू झाली की अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आमच्यापैकी काहींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावतात. आम्ही आंबे कसे पिकवितो, कुठून आणतो, कसे आणतो. खरेतर आम्ही आंबा पिकविण्यासाठी कोणतेही रसायन वापरत नाही, याची खात्री असल्यानेच ग्राहक आमच्याकडून वर्षानुवर्षे आंबे घेतात. प्रामाणिकपणे व्यवसाय करून आम्ही कोकणचा हा मेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवतो, अशी माहिती एका विक्रेत्याने दिली

 

एका पेटीला २५० रूपये खर्च
चार ते पाच डझन आंब्यांची एक पेटी कोकणातून ठाण्यात येईपर्यंत पॅकिंग आणि वाहतूकीसह २५० रूपये खर्च येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले

- Advertisement -

 

विष्णूनगरमध्ये दहा वर्षांपूर्वी मी आंबा विक्रीचा व्यवसाय सुरू केला, तेव्हा मी एकटाच होतो. आता इथे ११ दुकाने झाली आहेत. नौपाडा हे आता आंबा विक्रीचे मोठे केंद्र झाले आहे.
-विघ्नेश जोशी, जोशी आंबेवाले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -