घरमुंबईरेल्वेने शेकडो मराठी उमेदवारांना भरतीपासून ठेवले वंचित

रेल्वेने शेकडो मराठी उमेदवारांना भरतीपासून ठेवले वंचित

Subscribe

रेल्वे भरती बोर्डाने अनेक मराठी विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेवले. मराठी मुलांवरील या अन्यायाच्या विरोधात आज शिवसेनेने आंदोलन केले.

रेल्वे भरतीमध्ये नेहमी मराठी उमेदवारांवर अन्याय होत असतो. यंदाच्या भरती प्रक्रियेतील ऑनलाईन परीक्षेत रेल्वेने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी शेकडो मराठी उमेदवारांना क्षुल्लक कारणावरून परीक्षेपासून वंचित ठेवले. यासंबंधीचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने सर्वप्रथम १८ सप्टेंबर रोजी रेल्वेची परीक्षा रुळावरून घसरली या मथळ्याखाली प्रकाशित केले होते. त्यानंतर त्याचे पडसाद उमटले असून आज (शुक्रवारी) शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली स्थानीय लोकाधिकार समितीने मुंबई सेंट्रल येथे रेल्वे बोर्डाच्या कार्यालयावर धडक मारली. रेल्वेने ज्या मराठी मुलांना परीक्षेला बसू दिले नाही. त्यांची परीक्षा लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणीही शिवसैनिकांनी यावेळी केली.

रेल्वे भरती बोर्डाने विभिन्न ९५ हजार पदांच्या जागेसाठी देशभरात परीक्षा घेण्यात सुरुवात केली आहे. यात ग्रुप ‘डी’ची परीक्षा बुधवारपासून घेण्यास सुरुवात केली आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थांनी अर्ज केले, परंतु काही मराठी उमेदवारांना थातूरमातूर कारणे देत परीक्षेला बसू दिले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यासंबंधीचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने सर्वप्रथम प्रकाशित केले होते. त्यानंतर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसैनिकांनी मुंबईच्या रेल्वे भरती बोर्डाच्या कार्यालयावर धडक मारत शिवसेना स्टाईल आंदोलन केले. या आंदोलनात आमदार सुनील शिंदे आणि शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ उपस्थित होते.

- Advertisement -
MUMBAI ENTRAL DRM PROTEST
शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन (फोटो -प्रवीण काजरोळकर)

रेल्वेची ही परीक्षा मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांमध्ये सुरू आहे. ही परीक्षा खासगी कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने विविध सत्रांमध्ये घेण्यात येते. परीक्षेला येताना छायाचित्र असलेले कोणतेही सरकारी ओळखपत्र सोबत बाळगावे, अशी सूचना रेल्वेची जाहिरात आणि प्रवेशपत्रावर दिली होती. परंतु परीक्षार्थींनी आधार कार्ड दाखवल्यावरही ते आधार कार्ड डुप्लिकेट असल्याचे सांगत पुणे आणि मुंबईच्या परीक्षा केंद्रांवर मराठी उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर परीक्षार्थींनी पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स दाखवल्यावर त्यातही त्रुटी काढून परीक्षेपासून वंचित ठेवले. सोबतच रेल्वे भरती बोर्डाचे सर्व्हर डाऊन असल्याचे कारण देतही अनेकांना प्रवेश नाकारला. संबंधित उमेदवारांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकार्‍यांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही.

रेल्वेत परप्रांतीच्या टक्का वाढविण्याचा अधिकार्‍यांचा डाव

रेल्वे भरती बोर्डात महाराष्ट्रामध्ये ८५ टक्के जागा मराठी भाषिकांसाठी आरक्षित आहेत. मात्र महाराष्ट्रात रेल्वे बोर्डात पूर्वीपासून मराठी कर्मचार्‍यांचा टक्का खूप कमी आहे. यामागे रेल्वे प्रशासन प्रत्येक भरतीवेळी मराठी उमेदवारांना डावलत असल्याचे प्रमुख कारण आहे. महाराष्ट्रातील रेल्वेत परपरप्रांतीचा टक्का वाढविण्यासाठी काही रेल्वे अधिकारी जाणीवपूर्वक कटकारस्थान करतात. जर रेल्वेने मराठी भाषिकांच्या हक्काच्या ८५ टक्के जागा भरल्या नाही, तर रेल्वे प्रशासानाच्या विरोधात उग्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -