घरमुंबईमुंबई महापालिकेवर शिवसेनेचेच वर्चस्व राहणार - सुनील प्रभू

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचेच वर्चस्व राहणार – सुनील प्रभू

Subscribe

मुंबई महानगरपालिकेला २२ नोव्हेंबर रोजी नवे महापौर मिळणार आहेत. एका छोट्या राज्याएवढे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेचे महापौरपद हे कामाचे आहे की मानाचे? या विषयावर माय महानगरच्या खुल्लमखुल्ला या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मुंबई मनपाचे माजी महापौर आणि विद्यमान आमदार सुनील प्रभू यांच्याशी राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर यांनी बातचीत केली. मुंबई महापालिकेचा कारभार, महापौराची कर्तव्ये, शिवसेनेचे राजकारण, पायाभूत सोयी-सुविधा या आणि इतर विषयांवर सुनील प्रभू यांनी आपली स्पष्ट मते व्यक्त केली.

शिवसेना पक्षप्रमुखांच्या प्रेरणेने प्रत्येक शिवसैनिक काम करत असतो. जेव्हा आम्हाला आव्हान दिले जाते, तेव्हा शिवसैनिक आणखी पेटून उठत काम करतो. मुंबई महानगरपालिकेवर फक्त शिवसेनेचेच वर्चस्व आहे आणि राहणार. जर एखादा पक्ष पुढील काळात पालिकेत सत्ता स्थापनेचा दावा करत असेल तर शिवसैनिक आणि पालिकेतील नगरसेवक आणखी पेटून उठत काम करतील. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेने आजवर अनेक विकासकामे केली आहेत. मुंबई सर्वसामान्य कष्टकर्‍यांची आहे. या कष्टकर्‍यांसाठी मुंबई महापालिका काम करते. मुंबईकर जनतेचा विश्वास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर होता. आता तो उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. त्यामुळे शिवसेना भावनेला हात घालून राजकारण करते, हा आरोप मला मान्य नाही. शिवसेना सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेऊन त्याप्रमाणे पालिकेच्या योजना राबवत असते. त्या योजना लोकांना आवडत असल्यामुळेच शिवसेनेबाबत लोकांमध्ये आत्मियता आहे. त्यामुळेच गेली कित्येक वर्ष महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकत आहे.

लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पूर्वी रस्ते, पाणी, आरोग्य अशा समस्यांपर्यंत नगरसेवक मर्यादित राहत होते. मात्र आता लोक आपल्या वैयक्तिक समस्याही लोकप्रतिनिधीने सोडवाव्यात अशी भावना व्यक्त करत असतात. त्याला नगरसेवक देखील अपवाद नाही. त्यामुळे पायाभूत सोयी-सुविधा देण्यापासून लोकांच्या भावनांचाही आदर ठेवण्याचे काम नगरसेवकांवर आलेले आहे. शिवसेनेचे नगरसेवक या कामांमध्ये स्वतःला झोकून देतात.
रस्त्यावरील खड्डे आणि पालिकेचे प्रयत्न

- Advertisement -

मुंबईच्या महापौर पदासोबतच मी स्थायी समिती अध्यक्षपद, प्रभाग समिती अध्यक्षपद आणि विविध समित्यावर काम केलेले आहे. माझ्या माहितीनुसार पालिकेने नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. परदेशात ज्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते, ते मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला गेला. एखादे तंत्रज्ञान परदेशात चांगले वाटते, मात्र मुंबईत परदेशी तंत्रज्ञान राबवत असताना त्यात काहीतरी तांत्रिक बाबी राहिल्यामुळे समस्या निर्माण होतात, हे माझे निरीक्षण आहे. कारण परदेशी तंत्रज्ञान आपल्याइथे राबविण्यासाठी आपल्याला इथल्याच कंपनीची मदत घ्यावी लागते हे देखील यामागचे प्रमुख कारण असू शकते. यासोबतच मुंबईची भौगोलिक परिस्थिती इतर शहरांपेक्षा वेगळी आहे. मुंबईत जास्त पाऊस पडत असल्यामुळे डांबरी रस्त्यावर पाणी साचून राहिल्यामुळे खड्डे पडतात. यावर उपाय म्हणून काँक्रिटचे रस्ते किंवा आरसीसी पद्धतीने बांधलेले रस्ते बनवायला हवेत, असे माझे मत आहे.

एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांमुळेच आरेमध्ये वृक्षतोड
आरेमधील मेट्रो कारशेडबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा भूमिका व्यक्त केलेली आहे. मात्र एमएमआरडीएच्या काही अधिकार्‍यांनी हट्टाने कारशेड आरेतच आणल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. आरेमध्ये ज्या पद्धतीने काही क्षणात झाडे कापली गेली, ते पाहता एकप्रकारे लोकशाहीचाच खून केला आहे. आरेचा परिसर माझ्या विधानसभा मतदारसंघात येतो. आरेमध्ये वृक्षलागवडीसाठी मी अनेकदा प्रयत्न केले होते. आरेच्या वृक्षतोडीला आमचा आजही विरोध आहे. शिवसेना राज्यात सत्तेत आल्यास आम्ही आरेला वनविभाग म्हणून घोषित करणार, हा आमचा शब्द आहे.

- Advertisement -

मराठी शाळांच्या अध:पतनाला केवळ शिवसेना जबाबदार नाही
मुंबईतील मराठी शाळांना घरघर लागलेली आहे. याला केवळ शिवसेना जबाबदार नसून लोकांची मानसिकता देखील कारणीभूत आहे. मुंबई शहरात मराठी भाषा टीकली पाहीजे, यासाठी शिवसेनाच पालिका आणि विधानसभेत आवाज उचलत असते. मात्र पालकच आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकत आहे, आपल्या मुलाने कॉन्व्हेंट शाळेत शिकावे असे पालकांना वाटते. मात्र दुसर्‍या बाजुला मुंबई महापालिकेच्या शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. मराठी शाळांना जी घरघर लागली आहे ती पालिकेच्या शाळांना नसून खासगी आणि अनुदानित मराठी शाळांना लागलेली आहे.

गजानन किर्तीकरांमुळे मला संधी मिळाली
विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे आमदार असताना त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत असताना मला खूप अनुभव मिळाला. अधिकारी, प्रशासन समजून घेता आले. लोकहिताचे काम करत असताना प्रशासनाबरोबर कसा समन्वय साधला पाहिजे, याचे प्रशिक्षणच मला मिळाले. या अनुभवाचा फायदा मला नगरसेवक झाल्यानंतर झाला. चांगले काम करु शकलो आणि त्यामुळेच मला महापौर होण्याची संधी मिळाली. महापौर झाल्यानंतरही पालिकेसोबत सामान्य माणसाशी

नाळ जोडून पालिकेचा कारभार हाकता आला.
महापौर पदावर बसल्यानंतर प्रत्येकाचे काहीतरी करुन दाखवायचे स्वप्न असते. मी सामान्य शिवसैनिक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेला जी उत्तरे द्यावी लागतात, ती मला चांगली माहिती होती. माझ्या अनुभवाची शिदोरी आणि उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर मी माझ्या महापौर पदाच्या काळात चांगले काम करु शकलो.

(शब्दांकन – किशोर गायकवाड)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -