घरमुंबईनवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढतेय!

नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढतेय!

Subscribe

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीच्या दबावात गुरफटलेली शिवसेना विध्यमान काळात महाराष्ट्रात एक नंबरवर आली. राज्याचा गाडा महाविकास आघाडी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हाकत आहे. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उठलेल्या राजकीय वादळात भाजपसोबत विरोधक असलेल्या अनेकांचे मनसुबे धुळीला मिळाले. राज्यात एक नवी राजकीय क्रांती घडली. कॉमन मिनिमम प्रोग्राम हे नव्या राजकीय आघाडीचे सूत्र होते. महाराष्ट्रातील या सत्तांतरणामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नवसंजीवनी मिळालीच, पण शिवसेना पक्षाला मोठे बळ आले. त्यामुळे राज्यातील इतरत्र शिवसेना वाढीला गती आली. राज्यात आणि नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे.

राज्यातील सत्तेचा मोठा परिणाम नवी मुंबईत झालेला दिसतो आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही खरं नाही, असा समज झालेले माजी मंत्री तथा नवी मुंबईचे नेते गणेश नाईक राष्ट्रवादी सोडून भाजपात गेले. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्तेची गणितं हुकली. शिवसेनेला दाबून पुढे जाण्याचा भाजपचा डाव शिवसेनेच्या नेत्यांनी ओळखला आणि हाणून पाडला. त्यामुळे सत्तेची स्वप्ने पाहून भाजपात गेलेले नाईक हताश झाले. राजकीय पटलावर असे म्हणतात, गणेश नाईक यांची इच्छा नसताना पुत्र हट्टापायी भाजपात जावे लागले. मात्र, नाईकांच्या या निर्णयामुळे त्यांच्या अनेक वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला संथ गती आली.

- Advertisement -

गणेश नाईक म्हणजे नवी मुबईचे एकमेव बलाढ्य नेतृत्व असा त्यांचा ठसा होता. भाजप प्रवेशानंतर चुकलेल्या गणिताने सगळी समीकरणे बदलली. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला मिळालेली सत्ता भाजपकडे वळली. मात्र विध्यमान काळात २०२० मधील महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा पालिकेवर फडकवताना अडचणीचे ठरणार आहे. गणेश नाईकांमुळे नवी मुंबईत सर्वात बलाढ्य झालेल्या भाजपला दिवसागणिक सुरुंग लावण्याचे काम शिवसेना करत आहे.

नवी मुंबईतील पक्षांतरामध्ये अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवकांची पहिली पसंती शिवसेनेला असल्याचे चित्र पहायला मिळते. २०१५ मध्ये गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक जिंकून आले होते. गणेश नाईक यांनी अख्ख्या राष्ट्रवादी पक्ष फोडला. ५२ पैकी ४९ नगरसेवक भाजपात दाखल झाले. पुढच्या काळात राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी नवी मुबंईत राष्ट्रवादीला पुन्हा उभे केले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांवरून हे स्पष्ट झाले. कारण २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळाली अर्धा लाख मतांमध्ये २०१९ मध्ये काही फरक पडला नाही.

- Advertisement -

भाजपात गेलेले ४९ नगरसेवकांमधील अनेकजण अस्वस्थ होते. महापालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महाविकास आघाडीने वाशी येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपवासी झालेले नगरसेवक अजूनच बेचैन झाले. याचा फायदा घेत शिवसेनेने अनेकांना फोडले. २०१४ मध्ये शिवसेनेचे ३८ नगरसेवक होते. मागील दोन महिन्यात शिवसेनेने भाजपचे ७ नगरसेवक फोडले. आता शिवसेनेचे नगरसेवक ४५ झाले आहेत. मागील महिन्यात राष्ट्रवादीचे ७ आजीमाजी नगरसेवक स्वगृही परतले आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांचा नवी मुंबईतील राजकीय प्रभाव कमी झाल्याचे दिसत आहे.

तुर्भे येथील जेष्ठ नेते सुरेश कुलकर्णी यांच्या भोवतालीच येथील राजकारण मागील २५ वर्ष फिरते आहे. राष्ट्रवादीला ताकद देणारे सुरेश कुलकर्णी चार नगरसेवकांसह शिवसेनेत गेले. सुरेश कुलकर्णी हे गणेश नाईक यांचे खंदे समर्थक होते. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने नाईकांना मोठा धक्का मानला जातो. शनिवारी भाजपचे अशोक नरबागे, चंद्रकांत आगोंडे, भोलानाथ ठाकूर शिवसेनेत दाखल झाले. अनेकजण अद्यापि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते करत आहेत. त्यामुळे नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढत आहे. आगामी काळात शिवसेना हा नवी मुंबईत बलाढ्य पक्ष ठरेल असे चित्र दिसत आहे.

नवी मुंबईची धुरा सध्या शिवसेना नेते विजय नाहटा, विरोधीपक्षनेते विजय चौगले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे , जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर सांभाळत आहेत. सुरेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. अशोक नरबागे यांनी सीबीडी-बेलापूर येथे भाजपला सुरुंग लावला. शिवसेनेने मागील पाच वर्षात केलेली कामे आणि राबवलेल्या सामाजिक उपक्रमांमुळे नवी मुंबईत शिवसेनेची प्रतिमा वाढलेली आहे. अनेक नगरसेवक शिवसेनेत आले, अनेकजण येण्यास इच्छुक आहेत. जिथे जागा रिकाम्या आहेत तिथे आम्ही प्रवेश देत आहोत, शिवसेनेचा प्रभाव मागणी काळात आणखी वाढलेला दिसेल, असा विश्वास शिवसेना नेते विजय नाहटा यांनी ’आपलं महानगर’ शी यानिमित्ताने बोलताना व्यक्त केला.

नवी मुंबई महापालिका निवडणूक अगदी तोंडावर आल्या आहेत. वाढत्या शिवसेनेला रोखण्याचे मोठे आव्हान गणेश नाईक यांच्यापुढे आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी देखील जोमाने कमला लागली असून पक्ष वाढीसाठी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी कंबर कसली आहे. नवी मुंबईत भाजपचे दोन आमदार असताना भाजपला वाढवताना एकसंघ प्रभाव दिसत नाही. नवी मुंबईत भाजपची सत्ता आणण्याचे स्वप्न गणेश नाईक यांनी भाजप नेत्यांना दिले आहे. ते आता कितपत खरे ठरेल हे येणारी वेळ ठरवेल.

नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढतेय!
Sanjay Mahadikhttps://www.mymahanagar.com/author/sanjay-mahadik/
गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. प्रिंट, टीव्ही, डिजिटल मीडियाचा अनुभव. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -