घरमुंबईआता जलतरण तलावांची सदस्यता ऑनलाईन

आता जलतरण तलावांची सदस्यता ऑनलाईन

Subscribe

मुंबई महापालिकेच्या जलतरण तलावांत पोहण्यासाठी आता ऑनलाईन सदस्यता घरबसल्या देण्यात येत आहे. तलावांत पोहणाऱ्या सदस्यांना कोणत्या वेळेत किती सदस्य पोहत आहेत, त्यांची नेमकी संख्या किती आहे, गर्दी तर नाही ना, याबाबतची माहितीही ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या उपलब्ध होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या जलतरण तलावांत पोहण्यासाठी आता ऑनलाईन सदस्यता घरबसल्या देण्यात येत आहे. तलावांत पोहणाऱ्या सदस्यांना कोणत्या वेळेत किती सदस्य पोहत आहेत, त्यांची नेमकी संख्या किती आहे, गर्दी तर नाही ना, याबाबतची माहितीही ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या उपलब्ध होणार आहे. तसेच, आपण कोणत्या वेळेत पोहण्यासाठी जावे याबाबतचे योग्य नियोजनही संबंधितांना करणे सुलभ होणार आहे. (Swimming pool membership online now)

मुंबई महापालिका मुंबईकरांना चांगले रस्ते, शिक्षण, उद्याने, शाळा, रुग्णालय, पिण्याचे शुद्ध पाणी आदी सेवासुविधा देत आहे. त्याचबरोबर इच्छुक नागरिकांना पोहण्यासाठी जलतरण तलावांची सुविधाही गेल्या अनेक वर्षांपासून माफक दरात बहाल करते. मात्र जलतरण तलावांत पोहण्यासाठी छापील अर्ज भरून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सदस्यता मिळविणे कठीण असते. मात्र आता महापालिकेने ऑनलाईन अगदि घरबसल्या सदस्यता मिळवून देण्यासाठी आजपासून सुलभ प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या हस्ते या ऑनलाईन प्रक्रियेचे लोकार्पण मंगळवारी महापालिका मुख्यालयात करण्यात आले.

- Advertisement -

याप्रसंगी, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, संचालक (माहिती व तंत्रज्ञान) तथा सहाय्यक आयुक्त शरद उघडे, या प्रक्रियेसाठीचे समन्वयक संदीप वैशंपायन, लेखा परिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी सचिन गांगण यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या दहिसर परिसरातील श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव येथील प्रक्रिया आजपासून ऑनलाईन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर २४ ऑगस्टपासून चेंबूर (पूर्व) येथील ‘जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव’ (ऑलिंपिक) आणि कांदिवली परिसरातील ‘सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव’ (ऑलिंपिक) या दोन्ही जलतरण तलावांची सदस्यत्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दादर परिसरातील महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलावाची ऑनलाईन सदस्यत्व नोंदणी २५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या चारही तरण तलावांसाठी एकूण ६ हजार व्यक्तिंना ऑनलाईन पद्धतीने सदस्यत्व नोंदणी दिली जाणार आहे, अशी माहिती उप आयुक्त किशोर गांधी यांनी दिली आहे.

जलतरण तलावांच्या ऑनलाईन सदस्यत्व प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

  • महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर (होम पेज) जलतरण तलाव वार्षिक सदस्यत्व नोंदणीची ‘लिंक’ देण्यात आली आहे.
  • या लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडणा-या वेब पेजवर अत्यंत सोपा व सुटसुटीत ऑनलाईन अर्ज आहे.
  • हा अर्ज भरताना इतर प्राथमिक माहितीसह आपला आधार क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरुन सबमिट केल्यानंतर ऑनलाईन शुल्क भरणा करावा लागेल.
  • दादर, कांदिवली व चेंबूर येथील जलतरण तलावांचे वार्षिक सदस्यता शुल्क हे रुपये १० हजार १०० इतके आहे. तर दहिसर येथील जलतरण तलावांचे वार्षिक सदस्यता शुल्क हे रुपये ८ हजार इतके आहे.
  • या शुल्कामध्ये शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक इत्यादींना वार्षिक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत असणार आहे.
  • ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर व ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणा केल्यानंतर ३० दिवसांच्या आत जलतरण तलावाच्या कार्यालयात वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड व शुल्क भरल्याचा पावती क्रमांक सादर करावयाचा आहे.
  • या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर अर्जदाराचे सभासदत्व सक्रिय केले जाणार आहे. यानंतर ‘फेस रिकग्निशन’साठी सभासदाची छायाचित्र नोंदणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे केली जाणार आहे.
  • पूर्वी जलतरण तलावांच्या सदस्यांना दररोज ४५ मिनिटे पोहण्याचा कालावधी दिला जात असे. आता या कालावधीत १५ मिनिटांची वाढ करुन हा कालावधी सर्वांसाठी १ तास असा करण्यात आला आहे.
  • जलतरण तलावाच्या ठिकाणी सभासदाच्या आगमन – निर्गमनावेळी ‘फेस रिगग्निशन’द्वारे स्वयंचलित पद्धतीने सभासदांची नोंदणी होणार आहे. त्यामुळे एखादा सदस्य निर्धारित एका तासाच्या कालावधीपेक्षा अधिक तास पोहत असल्यास, त्या व्यक्तिच्या वार्षिक सदस्यत्वाच्या कालावधीतून अतिरिक्त पोहण्याचा कालावधी स्वयंचलित पद्धतीने वजा होणार आहे. यामुळे अधिक व्यक्तिंना जलतरण तलावाचा लाभ घेणे शक्य होण्यासोबतच सुटीच्या कालावधीत जलतरण तलावांवर होणारी गर्दी नियंत्रित करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा – …तोपर्यंत देशात लोकशाही राहील बेबंदशाही येणार नाही- उद्धव ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -