घरमुंबईठाण्यात इमारती अनधिकृत, मग मतं कशी अधिकृत?

ठाण्यात इमारती अनधिकृत, मग मतं कशी अधिकृत?

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईतील स्मारक उभे राहायला अजून वेळ असला तरी, बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा मान ठाणे नगरीने मिळविला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात व्यक्त केली. ठाण्यातील ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे‘ यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते किसननगर क्रमांक ३ मध्ये क्लस्टर या महत्त्वाकांक्षी योजनेचा नारळ फोडून भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तोफ डागली. ते म्हणाले ठाण्यातील इमारती अनधिकृत आहेत. मग मतं अधिकृत कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही सत्तेत असो किंवा नसो; पण दिलेला शब्द आपण पाळतो असा टोला त्यांनी विरोधक भाजपला लगावला.

त्यानंतर ठाण्यात प्रथमच दौर्‍यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे इ-उद्घाटन करण्यात आले. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिलेल्या तीन हात नाका येथील स्मारकाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा गुरुवारी ठाण्यात पार पडला. या स्मारकात बाळासाहेबांच्या दुर्मिळ चित्रांचा समावेश असून बाळासाहेबांवर प्रेम करणार्‍या तमाम जनतेसाठी ती एक पर्वणीच ठरणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच ठाणे दौरा असून या दौर्‍यात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. किसननगर नं. ३ मधील क्लस्टर प्रकल्पाचे उद्घाटन करताना याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला.

- Advertisement -

आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात येऊ घातलेल्या क्लस्टर योजनेबद्दल म्हणाले की हा अत्यंत धाडसी प्रकल्प असून देशातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या प्रकल्पासाठी आपण तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे गेलो, त्याच प्रकल्पाचे आपण मुख्यमंत्री म्हणून उद्घाटन करत असल्याने आपल्याला अतिव आनंद झाल्याचे ते म्हणाले. सत्तेत असो वा नसो पण आपण जे वचन देतो, ते पाळतोच अशा शब्दात त्यांनी आपले सत्तेतील पूर्वीचे सहकारी भाजप पक्षाला टोला लगावला.

राजकारणी म्हणून आपण जनतेकडून हक्काने मते मागतो मग त्याच जनतेला हक्काचे घर देणे आपले परमकर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील इमारती अनधिकृत असल्याचा कांगावा करण्यात येतो. मग ही मतं अधिकृत कशी? असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. या जम्बो उद्घाटन सोहळ्याला राज्याचे नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि अधिकारी यांच्यासह ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे सर्व आमदार आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा ठाण्यातील पहिला दौरा होता. त्यातच बाळासाहेबांचे स्मारक आणि विविध प्रकल्पाचे उद्घाटन आल्याने शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलेली होती. या कार्यक्रमात ठाण्यातील प्रकल्प बाधित, बीएसयुपी, अपंगांना सदनिकांच्या चाव्या वाटप करण्यात आल्या.

- Advertisement -

आता मुंबईबाहेरही एसआरए

यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले, मुंबई वगळता मुंबई महानगर प्रदेशच्या विकासासाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) स्थापन करण्यात येईल. या घोषणेमुळे ठाण्यातही एसआरए योजनेचे दरवाजे खुले होणार आहेत. ठाणे शहरानंतर क्लस्टर विकास योजना संपूर्ण एमएमआर प्रदेशात राबविण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करण्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -