घरनवरात्रौत्सव 2022लालबागच्या राजाप्रमाणे टेंभी नाक्याची भवानी प्रसिद्ध

लालबागच्या राजाप्रमाणे टेंभी नाक्याची भवानी प्रसिद्ध

Subscribe

तत्कालिन शिवसेना जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेला ठाण्यातील टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवाची महती केवळ ठाणे शहरापुरतीच मर्यादित राहिली नसून आज महाराष्ट्राच्या अनेक भागांत पोहोचली आहे. विशेष म्हणजे लालबागच्या राजाप्रमाणे टेंभी नाक्याच्या भवानी मातेची मूर्ती प्रसिद्ध असून अतिशय प्रसन्न मुद्रा हे या मूर्तीचे खास वैशिष्ट्य आहे. चेहर्‍यावरील तेज तसेच भक्तांना आशीर्वाद देत असलेले तिचे बोलके डोळे हे या मूर्तीचे खास वैशिष्ट्य आहे. आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या भवानी मातेच्या उत्सवात फक्त शिवसेनेचाच सहभाग मर्यादीत राहीलेला नसून सर्व विरोधी पक्षांचे नेते देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात.

याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविक मोठ्या संख्येने ९ दिवसांत देवीचे दर्शन घेण्यासाठी ठाण्यात आवर्जून येतात. भवानी माता आपल्या आशाआकांक्षा नक्की पूर्ण करेल असा त्यांना विश्वास वाटतो, आणि आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर पुढच्यावर्षी आणि नंतरही भाविक भवानी मातेच्या चरणी लीन होतात.

- Advertisement -

विशेष म्हणजे टेंभी नाक्यावरील भवानी मातेची सुप्रसिद्ध मूर्ती साकारत आहे ती म्हणजे शिळकरांची तिसरी पिढी. प्रारंभी अगदी छोट्या प्रमाणात या उत्सवास सुरुवात झाली. देवीची मूर्ती छोटी होती. पण पुढे काळाच्या ओघात उत्सव लोकप्रिय होत गेला. भक्तांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत गेली आणि मग उत्सवाचे स्वरुपही भव्यदिव्य होत गेले.

या नवरात्रोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे देवीची मूर्ती. ही मूर्ती खरोखरच सर्वार्थाने वैशिष्ठ्यपूर्ण आहे. ही मूर्ती घडविण्यामध्ये शिळकर परिवाराचा मोलाचा वाटा आहे. या मूर्तीच्या चेहर्‍यावरील विलक्षण तेज, सोज्वळ भाव, आश्वासक हास्य आणि तिचे रुप या गोष्टी भक्तांच्या मनात घर करतात. पारंपरिक व्यावसायिक मूर्तीकार गणपत नत्थु शिळकर यांनी सर्वप्रथम ही मूर्ती तयार करायला सुरुवात केली. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले पुंडलिक शिळकर, किरण शिळकर बंधूंनी या मूर्तीला आकार दिला. कालांतराने पुंडलिक शिळकर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र विनोद आणि दीपक या बंधूंनी हा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी टेंभीनाक्याच्या उत्सवाला साजेशी मूर्ती साकारण्यात खंड पडू दिला नाही. वडिलांसोबत राहून मूर्ती घडवण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले.

- Advertisement -

घरामधील वातावरण परंपरेने याच व्यवसायाचे असल्याने दोघेही लहानपणापासूनच सहजतेने मूर्ती बनवत असत. पारंपरिक व्यवसाय असल्याने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अशी वडिलांची सक्त ताकिद असे. त्यामुळे दोघेही मूर्तीकार म्हणूनच नावारुपाला आले. वडिलांचे छत्र लवकरच हरपल्यामुळे अगदी कमी वयातच त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी येऊन पडली. मात्र काकांच्या मदतीने शिळकर कुटुंबियांची तिसरी पिढी आजही ही जबाबदारी पेलत आहे. दिघेसाहेंबापासून सुरू झालेली परंपरा आणि त्यांना अपेक्षित असलेली देवीची प्रसन्न मूर्ती आजही त्याच पद्धतीने बनवून विनोद आणि दीपक टेंभीनाक्याच्या देवीचे महात्म्य आणि भक्तीभाव जपत आहेत. याकामी त्यांच्या भगिनी भारती गजानन पोतदार आणि मनिषा कैलास भोईर यांचाही हातभार लागत असतो.

उत्सवाचे वैशिष्ठ्य म्हणजे नवरात्रो-त्सवाच्या काळात देवीची होणारी षोड्षोपचारे पूजा, ‘नवसाला पावणारी हाकेला धावणारी’, अशी ख्याती असल्यामुळे हजारो भाविक देवीची ओटी भरण्यास, नवस बोलण्यास व फेडण्यास या ठिकाणी येतात. आज या उत्सवाला अतिभव्य असे यात्रेचे स्वरुप आले आहे.

जनसामान्यांप्रमाणे माननीय शिवसेना-प्रमुख बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे नित्यनेमाने देवीच्या दर्शनाकरिता येत असत. तिच परंपरा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे,रश्मी ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, शर्मिला ठाकरे यांनी सुरू ठेवली आहे.

टेंभी नाक्यावरील देवीची मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली की, आनंद दिघेसाहेब नेहमीच येत असत. लहाणपणी बाबांना मदत करण्यासाठी मी नेहमी बाबांसोबत असे. अशा वेळी एकदा आनंद दिघेसाहेब आले आणि त्यांनी मला आपल्या मांडीवर बसवले. मला म्हणाले, तुही बाबांसारखाच मूर्तीकार होशील. दिघेसाहेबांनी पाठीवरून फिरवलेला हात आजही मला खूप प्रोत्साहन देतो. दिघेसाहेब खूप श्रद्धाळू होते. मूर्ती बनवताना प्रत्येक बारीकसारीक गोष्टींवर त्यांची नजर असायची. मूर्तीचे काम सुरू झाले की ते तासन्तास येथे येऊन बसायचे. स्वत: बदल सुचवायचे. अगदी रंगकामही मनासारखे करून घ्यायचे. त्यामुळे या मूर्तीमध्ये एक प्रकारचा भक्तीरस निर्माण व्हायचा. आताही मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली की कार्यकर्ते येतात आणि मार्गदर्शन करीत असतात.
– विनोद शिळकर, मूर्तीकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -