घरमुंबईतुर्भे ते खारघर बोगद्याच्या कामास गती!

तुर्भे ते खारघर बोगद्याच्या कामास गती!

Subscribe

तुर्भे येथील वाहतुक कोंडी फुटावी यासाठी आमदार गणेश नाईक शासन स्तरावर पाठपुरावा करित होते. यासाठी तुर्भे ते खारघर हा नियोजित भुयारी मार्ग लवकरात-लवकर सुरू करावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. या विषयी त्यांनी राज्य अधिवेशनात विचारलेल्या तारांकित प्रश्नाला मिळालेल्या उत्तरातून या भुयारी मार्गाच्या कामाला गती मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागाराने या कामाचा अंतिम आराखडा तयार केला असून तो शासनाच्या पायाभूत समितीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

हा भुयारी मार्ग तयार झाल्यावर तुर्भे येथे वाहतूक खोळंबणार नसून ती थेट खारघर येथे बाहेर पडेल. तसेच सायन-पनवेल मार्गावरील वाहतुक सुरळीत होणार आहे. आमदार नाईक यांनी या भुयारी मार्गासंबंधी विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात तारांकीत प्रश्न विचारला होता. त्यावर सभागृहात चर्चा झाली. सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या मार्गाची आवश्यकता आमदार नाईक यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. सायन-पनवेल मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, कल्याण व पुढे कळंबोली, जेएनपीटी, पुणे अशा भागात जाणारी वाहतूक याच मार्गाने होत असते.

- Advertisement -

ज्या मार्गावरून ताशी ७० कि.मी. वाहने धावणे अपेक्षित आहे. त्या रस्यावर वाहतूक कोंडीमुळे ताशी ४० ते ५०च्या गतीने वाहने धावत आहेत. वाशी खाडीपुलावर चौथा पूल बांधणे प्रस्तावित आहे. तो बांधून पूर्ण झाल्यावर तर सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता तुर्भे ते खारघर हा भुयारी मार्ग तातडीने मार्गी लागण्याची निकड आमदार नाईक यांनी बोलून दाखवली. तसेच खारघर येथे सिडको वाणिज्यिक केंद्र बांधणार असून सिडको महामंडळ देखील या भुयारी मार्गासाठी आर्थिक हातभार लावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नी सभागृहात उत्तर दिले. आमदार नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे या भुयारी मार्गाची आवश्यकता असल्याचे त्यांनी मान्य केले. १२ एप्रिल २०१९ रोजी शासनाने घेतलेल्या बैठकीत या प्रकल्पाच्या सल्लागारांनी दिलेल्या बांधकाम आराखड्यांपैकी एक आराखडा निश्चित करण्यात आला असून तो शासनाच्या पायाभूत समितीच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -